बुधवार, ३१ जुलै, २०१३

‘तासगाव’च्या विक्रीस उच्च न्यायालयाचा नकार

तासगाव साखर कारखाना विक्री करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला असून, यामुळे गणपती जिल्हा संघ व राज्य सहकारी बँकेस आणखी एक मोठी चपराक बसली आहे. बुधवारी हा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने जाहीर केला. तासगाव कारखान्याचे अवसायक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते संदीप राजोबा यांनी सभासदांच्यावतीने तासगाव कारखाना विक्री विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत तासगाव साखर कारखाना राज्य सहकारी बँकेने गणपती जिल्हा संघास कमी किंमतीत विकला आहे. त्या विक्रीस स्थगिती मिळावी, यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बरेच महिन्यापासून यावर युक्तिवाद सुरू होता. मात्र, मागील सुनावणी दरम्यानच न्यायालयाने विक्री करू नये, असे स्पष्ट संकेत दिले होते. मात्र, नेमकी भूमिका न्यायालयाने स्पष्ट केली नव्हती. गणपती जिल्हा संघाने बुधवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी.एम.कानडे व न्यायमूर्ती श्रीराम यांच्या खंडपीठासमोर संघाचे वकील आशितोष कुंभकोणी व अजित कुलकर्णी यांनी पुणे डीआरटीने तासगाव कारखाना अवसायकांची याचिका फेटाळली असून गणपती जिल्हा संघास हा कारखाना खरेदी करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली. यावेळी अवसायकांच्यावतीने न्यायालयात उमेश मानकापुरे म्हणाले, उगार शुगरला कारखाना दोन वर्षे चालवण्यास दिला होता. मात्र, दोन हंगामानंतर बेकायदेशीररित्या हा कारखाना शिखर बँकेने प्रायव्हेट टीटीच्या आधारे गणपती जिल्हा संघास साडेचौदा कोटीस विकला होता. यासाठी शासनाचीसुद्धा संमती नव्हती. सहकार खात्याच्या सर्व नियमांची पायमल्ली करण्यात आली होती. कारखान्याची एकूण मालमत्ता 100 कोटी असताना गणपती जिल्हा संघास साडेचौदा कोटी रूपयास तो कसा देण्यात आला? यामुळे यात मोठा गैरप्रकार घडला आहे, असे नमूद केले. यावेळी सोनहिरा साखर कारखान्याच्यावतीने बोलताना ऍड. प्रसाद दाणी म्हणाले, राज्य सहकारी बँकेने एक वर्षासाठी तासगाव कारखान्याची निविदा काढली. त्यात ‘सोनहिरा’ने 10 कोटीची निविदा भरली आहे. सोनहिरा एक वर्षात दहा कोटी देत असेल तर पाच वर्षासाठी गणपती जिल्हा संघास हा कारखाना साडेचौदा कोटीस कसा देण्यात आला? आमची बोली सर्वाधिक असल्याने हा कारखाना ‘सोनहिरा’ला चालविण्यास मिळावा, अशी मागणी केली. सभासदांच्यावतीने बाजू मांडताना ऍड. अमित साळे म्हणाले, हा कारखाना गणपती जिल्हा संघास चालविण्यासाठी देताना अनेक गैरप्रकार झाले आहेत. चुकीच्या पद्धतीने हा कारखाना गणपती जिल्हा संघास देण्यात आला आहे. सर्व परिस्थिती पाहता हा कारखाना दीर्घ मुदतीवर चालवण्यासाठी द्यावा व तो नंतर सभासदांचा व्हावा, अशी मागणी केली. यावेळी न्यायमूर्ती कानडे व न्यायमूर्ती श्रीराम यांनी सर्वांची मते विचारात घेऊन तासगाव साखर कारखाना विक्री करण्यास नकार देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. पुढील आठवडय़ात होणाऱया सुनावणीत सर्व याचिकांचा निकाल लागण्याची शक्यता आहे. यावेळी संदीप राजोबा, सत्याण्णा, दीपक मगदूम यांच्यासह इतर सभासद उपस्थित होते. अवसायक वाय.पी.गिरींची उपस्थिती गेली दोन महिने झाले तासगाव साखर कारखान्याचे अवसायक वाय.पी.गिरी विषयी सभासदांमध्ये एक वेगळेच माहोल उठले होते. अवसायकपदी नेमणूक झाल्यानंतर ते एकदासुद्धा कोणत्याही सुनावणीसाठी उपस्थित राहिले नव्हते. मात्र, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ते पहिल्यांदाच अवसायकाच्या भूमिकेत दिसून येऊन सुनावणीच्यावेळी ते उपस्थित होते. याची चर्चा सभासदांमध्ये सुरू होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा