सांगली परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील वि†िवध बातम्या, लेख, माहितीसाठी एक उपयुक्त व्यासपीठ... फोन करा 8275592062
बुधवार, १७ जुलै, २०१३
नवविवाहीत दाम्पत्याची गळफासाने आत्महत्त्या
तासगावातील हृदयद्रावक घटना
प्रेमाच्या आणाभाका घेत धावणारी लव्ह एक्सप्रेस अखेर विवाहाच्या थांब्यावर जाऊन थांबली. मात्र वैवाहिक सुखाचा आनंद लुटण्याच्या आधीच अवघ्या दहा दिवसातच बेळगाव जिल्हय़ातील रायबाग तालुक्यातील किमपट्टी येथील नवदाम्पत्याने तासगाव येथे गळफास लावून घेऊन जीवनाचा शेवट केला. विवाहास कुटुंबीयांचा विरोध असल्यानेच या नवदाम्पत्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
बेळगाव जिल्हय़ातील रायबाग तालुक्यातील किमपट्टी येथील राजू शंकर हेळवी (21) व शीला सुखदेव उप्पार (19) अशी या नवदाम्पत्याची नावे आहेत. राजू व शीला हे दोघे किमपट्टी येथे जवळजवळ राहात होते. ओळखीतून त्याचे प्रेमात रूपांतर झाले. या दोघांनी गेल्या काही दिवसापासून विवाह करायचाच असा निश्चय केला होता.
या प्रेमाची माहिती शीलाच्या कुटुंबीयांना समजली होती. त्यांचा विवाहास विरोध होता असे शीलाच्या लिखाणावरून स्पष्ट होत आहे. पाच जुलै रोजी या दोघांनी विवाह करायचाच असा निश्चय करून गावातून धूम ठोकली. सहा जुलै रोजी शीलाच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार रायबाग पोलीस स्टेशनला दिलेली होती.
राजू व शिला यांनी विवाह करून प्रवास करीत करीत तासगाव गाठले. मंगळवारी रात्री तासगाव-सांगली रोडवरील हॉटेल शिवप्रताप येथे दोघांनी भोजन केले. आणि तेथूनच फिरत फिरत हे दोघे याच मार्गावरील दत्तमंदिर येथे आले. काही वेळ तेथे थांबून आपल्या आयुष्याचा शेवट करायचा हे मनोमन ठरवून आलेल्या व सोबत आणलेली नायलॉनची दोरी परिसरातील उंबराच्या झाडास बांधली व याच झाडाच्या बाजूस असलेल्या कठडय़ावर दोघांनी मिळून दगडे रचली व याच दगडांवर उभे राहून दोघांनी स्वतंत्रपणे बांधलेल्या नायलॉनच्या दोरीस गळफास लावून घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. ही घटना पहाटे तीनच्या दरम्यान घडली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बुधवारी सकाळी पावणेसातच्या दरम्यान मंदिराचे पुजारी चंद्रकांत नारायण माळी हे उठले असता त्यांना ही घटना निदर्शनास आली. त्यांनी तातडीने तासगाव पोलीस ठाण्यात याबाबत कळवताच उपनिरीक्षक सुहास घोडके, अविनाश नडविणकेरी यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दोन्ही मृतदेह खाली उतरवले.
याचवेळी घटनास्थळी कानडी भाषेमध्ये शीला व राजू यांच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या मजकुराची वही पोलिसांना मिळून आली. त्यामुळे ते रायबाग तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले व रायबाग पोलीस स्टेशनला संपर्क साधून नातेवाईकांशी पोलिसांनी संवाद साधला. त्यावेळी या दोघांची ओळख पटली. दुपारी चारच्या दरम्यान राजू व शीलाचे कुटुंबीय तासगाव येथे दाखल झाल्यानंतर ओळख पटल्यानंतर दोघाचे ग्रामीण रूग्णालयात डॉ. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करण्यात आले.
घटनेचे वृत्त तासगाव शहरासह परिसरात वाऱयासारखे पसरले. आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. मात्र, हृदय हेलावणारी ही घटना मंदिर आवारात घडल्याने हळहळ व्यक्त होत होती. तपास उपनिरीक्षक सुहास घोडके हे करीत आहेत.
वहीतील मजकूर हृदय हेलावणारा
घटनास्थळी प्लॅस्टिक कॅरीबॅगमध्ये सापडलेल्या वहीमध्ये शीला व राजू यांनी कानडी भाषेमध्ये लिहलेला मजकूर हृदय हेलावणारा होता. शीलाने आमचे लग्न घरातील लोकांना मान्य नव्हते असे लिहिले होते. तर दोघांनीही आमचे एकमेकावर प्रेम होते. एकमेकाशिवाय आम्ही जगू शकत नाही. असे स्पष्ट करून आमच्या मृत्यूनंतर आमच्या दोघांचा अंत्यविधी एकत्र करावा असे म्हटले होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा