
सहकार क्षेत्राचा दीपस्तंभ ः लोकनेते राजारामबापू पाटील
लोकनेते राजारामबापू यांचे जीवन म्हणजे सार्वजनिक जीवनातील कार्यकर्तृत्वाचा मोठा पर्वत आहे, या कार्यकर्तृत्वाचे जे-जे म्हणून पैलू आहेत, त्यांचा मागोवा घेतला, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, त्यांनी विकासकार्यासाठी सहकाराच्या माध्यमाचा प्रभावीपणे अवलंब केला. सहकार क्षेत्रात त्यांनी सर्वांगीण विकासाचे जे गौरवशाली कार्य केले, त्यामागे लोकसेवेची दृढ भावना होती. शेतकऱयांचे जीवनमान उंचावण्यासाठी बापूंनी भगिरथ प्रयत्न केले. सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्यकर्तृत्व महत्वपूर्ण आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱयांच्या जीवनात आर्थिक संपन्नता आणण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. सहकार क्षेत्राचे मूळ सूत्र शेतकरी असला पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी विविध संस्थांचा विकास केला.
राज्यातील सहकार चळवळीला प्रदीर्घ परंपरा आहे. जुन्या सांगली संस्थानातही या सहकार प्रणालीवर आधारित काही संस्था चांगल्याप्रकारे काम करत होत्या. स्वातंत्र्याचा सूर्योदय झाल्यावर जसे अनेकविध उपक्रमांनी त्या सूर्याचे स्वागत झाले. तसेच ते ‘सहकार तत्वावरील नवनव्या प्रकल्प उभारणीतून’ही झाले, कारण स्वातंत्र्यानंतर जनसामान्यांचा जीवनस्तर उंचावणे मोठे आव्हान होते. ‘विना सहकार नही उद्धार’चा उद्घोष झाला, तो स्वराज्याचे सुराज्य व्हावे, या कल्पनेतूनच झाला. सर्वधर्मसमभाव-एकता-बंधुता या संकल्पना सहकारामध्ये सामावल्या आहेत आणि त्यादृष्टीने सहकाराची थोरवी रूजवणारे जे नेते विकासकार्यात अग्रेसर राहिले, त्या मालिकेत लोकनेते राजारामबापू पाटील यांचे स्थान महत्वपूर्ण आहे. सहकाराच्या आधारावर बापूंनी घडवलेल्या विकासाचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो.
राज्याचा विकास आणि प्रगतीची बांधिलकी राजारामबापूंनी मंत्रिपदावरून घेतलेल्या अनेक निर्णयामधून दिसून येते. सहकार क्षेत्रातील शेती उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण करण्यास बापूंनी उद्योगमंत्रीपदाच्या कालावधीत चालना दिली. 1967 मध्ये त्यांनी राज्याच्या उद्योग खात्याची जबाबदारी स्वीकारली. या कालावधीत त्यांनी ग्रामीण भागात औद्योगिक वसाहती स्थापन करण्यावर भर दिला, यामागे ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीची क्षमता वाढावी, हा त्यांचा दृष्टिकोन होता. औद्योगिक वसाहती उभा करण्याच्या बापूंच्या धोरणामुळे आज विकसनशील भागातील औद्योगिकीकरण वाढत आहे, त्यांचे हे धोरण म्हणजे औद्योगिक विकासाचा महत्वाचा टप्पा ठरला आहे.
वीज मंत्रीपदाच्या कालावधीत बापूंनी शेतीला वीजपुरवठा करण्याच्या धोरणावर भर दिला. आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी ओळखली होती. भविष्यकाळातील महाराष्ट्र विकासाची व्हिजन त्यांच्याकडे होती, याचे हे ठळक उदाहरण आहे. राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनीही अशीच व्हिजन विकसित केली आणि प्रशासकीय कौशल्याचा ठसा निर्माण केला. विकासाचे एक रोल मॉडेल त्यांनी निर्माण केले. राज्यविकासात ते आज अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहेत.
लोकनेते राजारामबापूंनी शेतकरी आणि सामान्यांसाठी सहकाराच्या माध्यमातून साखर कारखाना, बँक, दूध संघ, ग्राहक भांडार, सूतगिरणी, पतसंस्था, दूध संस्था आणि पाणीपुरवठासारख्या संस्था उभारून आणि त्या यशस्वी करून, समग्र विकास साधला, हे आज सर्वमान्य झाले. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ हे सहकाराचे आद्य तत्व आहे, त्यातल्या-त्यात सबलांनी दुर्बलांना आधार देऊन, त्यांना स्वावलंबी करणे, त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे सहकाराचा आत्मा आहे. लोकसेवेचे हे माध्यम लोकनेते राजारामबापूंनी समग्र जीवनात प्रभावीपणे वापरले आणि अविरत लोकसेवा केली, म्हणूनच त्यांना ‘लोकनेते’ या सन्मानाने गौरवले गेले आहे. ज्या-ज्या सहकारी संस्था बापूंनी उभ्या केल्या, त्या सहकाराचा उद्घोष करणाऱया आहेत. राज्यभर बापूंनी कार्यकर्त्यांना सहकाराची प्रेरणा दिली. कवठेमहांकाळसारख्या अवर्षणग्रस्त भागात शेतकरी संघटन व्हावे, त्यांना बळ प्राप्त व्हावे, म्हणून बापूंनी महांकाली सहकारी साखर कारखाना उभारण्याची प्रेरणा दिली. सहकारातून विकासाचे काम करणाऱया व्यक्ती असोत वा संस्था, त्यांच्या पाठीशी ते सक्रीयपणे उभे राहात.
1961 मध्ये साखराळे येथील सहकारी साखर कारखान्याची स्थापना त्यांनी केली, हा राजारामबापू साखर कारखाना आज कृषी विकासाचा विलक्षण यशस्वी असा ‘राजारामबापू पॅटर्न’ म्हणून ओळखला जातो. या कारखान्याकडून जी उल्लेखनीय कामगिरी घडत आहे, त्यामागे लोकनेते राजारामबापूंची दूरदृष्टी आहे.
ऊस उत्पादन केवळ साखरेसाठी नसून, उपपदार्थनिर्मिती केली, तरच साखर कारखानदारीला चांगले दिवस येतील, हे बापूंनी 1983 मध्येच ओळखले आणि आशिया खंडातील सहकार क्षेत्रातील पहिल्या ऍसिस्टोन प्रकल्प उभारणी साखराळे येथील साखर कारखान्यात केली, या प्रकल्पाच्या स्थापनेवेळी साखर कारखान्यांनी उपपदार्थनिर्मितीकडे वळण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते, त्याचे महत्व आज समजून येते.
97व्या घटनादुरूस्तीनंतर राज्याच्या सहकार कायद्यात झालेल्या बदलांमुळे सहकार क्षेत्रात आता नवा अध्याय सुरू झाला आहे. सहकार चळवळ मोठय़ा कठीण परिस्थितीतून वाटचाल करत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या सहकार चळवळीसमोर मोठी आव्हाने उभी आहेत, या पार्श्वभूमीवर लोकनेते राजारामबापू पाटील यांची 94वी जयंती होत आहे. ‘सहकारातून उद्धार’ या तत्वाचे साक्षात दर्शनच बापूंनी कार्यातून घडवले. त्यांची कार्यपद्धती आणि विचार अथांग सागरावरील दीपस्तंभाप्रमाणे आहेत. या प्रकाशात लोकविकासासाठी बापूंनी दाखवलेल्या दिशेने मार्गक्रमण करण्याचा वसा कार्यकर्त्यांनी जोपासत राहणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे.