बुधवार, १७ जुलै, २०१३

संभाजी पवार, राजू शेट्टी यांना चांगली संधी

@ दिनेश ऐतवडे / समडोळी अखेर सर्वोदय कारखान्याचे भिजत घोंगडय़ाचा वाद मिटला. साखर आयुक्तांनी हा कारखाना संभाजी पवारांच्या ताब्यात देण्याचा निर्णय दिला आहे. महापालिका निकालानंतर ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना हा सलग दुसरा धक्का बसला आहे. हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच आमदार संभाजी पवारांना हा कारखाना ताब्यात देऊन खासदार राजू शेट्टी आणि आमदार संभाजी पवार यांना चांगली संधी मिळाली आहे. येणाऱया हंगामात पूर्ण क्षमतेने कारखाना चालवून दाखवण्याचे आव्हान मात्र त्यांच्यासमोर असणार आहे. सांगलीच्या वसंतदादा कारखान्याच्या विरोधात आंदोलन करून आमदार संभाजी पवार यांनी अखंड महाराष्ट्र ढवळून काढला होता. उसदराच्या आंदोलनात शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या बरोबरीने पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी सर्वात अगोदर आंदोलन केले होते. आंदोलन करतानाच त्यांनी आपला स्वतःचा सर्वोदय कारखाना उभारला. दरासाठी भांडणाऱया आमदार संभाजी पवारांना मात्र स्वतःचा कारखाना चालविता आला नाही. तीन वर्षे कारखाना त्यांनी तोटय़ात चालविला. त्यामुळे कारखान्यावर 75 कोटीचे कर्ज झाले. तत्कालीन अर्थमंत्री असलेल्या जयंत पाटील यांनी वनटाईम सेटलमेंट करून कर्ज 42 कोटी फेडले आणि कारखाना ताब्यात घेतला. आता 12 टक्के सरळ व्याजदराने राजारामबापू कारखान्याचे देणे 15 दिवसात भागवून कारखाना ताब्यात घ्या, असा आदेश साखर आयुक्तांनी दिला आहे. महाराष्ट्राचे राजकारण साखर कारखानदारीवर चालतं हे संभाजी पवारांनी पूर्णपणे ओळखले आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून त्यांनी कारखाना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले. परंतू, खरी कसोटी येथून पुढे आहे. ऐन लोकसभा आणि विधानसभेच्या तोंडाला संभाजी पवारांच्या ताब्यात हा कारखाना आला आहे. उसाचे क्षेत्र वाढत असूनही कारखाने तोटय़ात चालले आहेत. साखरचे दर नियंत्रणात आल्यामुळे उसाला दर कमी द्यावे लागत आहे. कारखान्यांची संख्या वाढल्यामुळे ऊस कमी पडत आहे. आणि त्यातच हंगामाच्या पूर्वीच खासदार राजू शेट्टी आंदोलनाच्या तयारीत असतात. त्यामुळे हंगाम महिना दीड महिना पुढेच जातो. या सर्व आव्हानांना तोंड देत संभाजी पवारांना वाटचाल करावी लागणार आहे. राज्यात साधारण 40 आजारी कारखान्यांची संख्या आहे. अनेक कारखान्यावर प्रशासक आले आहेत. कर्जमुक्त कारखानेच शेतकऱयांची देणी वेळेवर देऊ शकतात. त्यामुळे संभाजी पवारांना पहिल्यांदा कारखाना कर्जमुक्त करावा लागणार आहे. आमच्या ताब्यात कारखाना द्या, आम्ही शेतकऱयांना जादा दर देतो, असे जाहीरपणे सांगणाऱया खासदार राजू शेट्टी यांना आता आमदार संभाजी पवारांच्या रूपाने आयताच कारखाना मिळाला आहे. संभाजी पवार आणि खासदार राजू शेट्टी यांची विचारधारा जुळल्यामुळे कारखाना चांगला चालवून शेतकऱयांचा आशीर्वाद घेण्याची चांगली संधी राजू शेट्टी आणि संभाजी पवारांना मिळाली आहे. मिरज पश्चिम भाग आणि वाळवा तालुक्यात खासदार राजू शेट्टी यांनी उसाच्या आंदोलनावरच बरेचसे यश मिळविले आहे. गेल्यावर्षी तर ऊस आंदोलनात संभाजी पवार यांनी ऊडी घेतली होती. लक्ष्मी फाटय़ावर झालेल्या आंदोलनात संभाजी पवार स्वतः हजर होते. आता स्वतःचाच कारखाना असल्यामुळे राजू शेट्टींना निदान या भागात तरी आंदोलन करता येणार नाही. दर जाहीर केल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नाही, असे म्हणण्याची वेळ राजू शेट्टींवर येणार नाही. गेल्या दोन वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सर्वोदय बचावच्या माध्यमातून लढा देत होते. त्यांच्या प्रयत्नाना यश आले आहे. दूध दराचे आंदोलन करून शेतकऱयांना जादा दर मिळवून दिलेल्या खासदार राजू शेट्टींनी स्वतःची दूध संस्था काढून जादा दर देण्याचा प्रयत्न केला आहे. आता सर्वोदय कारखानाही संभाजी पवारांच्या ताब्यात म्हणजेच राजू शेट्टींच्या ताब्यात आल्यामुळे शेतकऱयांना जादा दर देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, यात काही शंका नाही. साखर कारखानदारीत एकूण दर किती देतो यापेक्षा पहिला दर कोण जाहीर करतो. याला अधिक महत्व असते. पहिला दर जाहीर केलेला कारखाना शेवटी एकूण दर किती देतो हे विचारात घेतले जात नाही. पहिला दर जाहीर करा, असे शेतकरी संघटनेची मागणी असते. दर जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत कारखाना सुरू करू देत नाहीत. आता स्वतःचा कारखाना झाल्यामुळे स्वतःच सर्वात पहिला दर जाहीर करावा लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा