शुक्रवार, १९ जुलै, २०१३

प्रभाग 22 साठी पुन्हा रिग्ंाण

प्रचारास प्रारंभ देशात मतदानादिवशीच निकाल घोषित करण्याच्या प्रायोगिक तत्वावरील प्रभाग 22च्या निवडणुकीचे रणांगण पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. दोन ऑगस्ट रोजी होणाऱया मतदानासाठी आता प्रचार पुन्हा एकदा शुक्रवारपासून सुरू झाला. या प्रभागात पुन्हा एकदा तिहेरी लढत आहे. मतदानादिवशीच काँग्रेसचे उमेदवार शामराव मुळके यांचे निधन झाल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर चारच दिवसात या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. अर्ज दाखल करण्यापासून पुन्हा एकदा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. शुक्रवारी छाननी झाली आणि आता याठिकाणाहून तिहेरी लढत होत आहे. काँग्रेसकडून माजी नगरसेवक कै. शामराव मुळके यांचे चिरंजीव प्रकाश मुळके हे लढत आहेत. तर राष्ट्रवादी कडून सुनील कलगुटगी, स्वाभिमानीकडून श्रीकृष्ण माळी हे रिंगणात आहेत तर महिला गटात विद्यमान नगरसेविका सौ. अनारकली कुरणे या काँग्रेसकडून तर संगीता वडर राष्ट्रवादीकडून आणि उमा संग्राम वाघमोडे या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. प्रभाग 22 हा कामगार, मजूर तसेच हातावर पोट असणाऱया मतदारांचा आहे. या प्रभागात आठ हजाराच्या आसपास मतदान आहे. यातील सर्वाधिक मतदान हे वडर समाजाचे आहे. तसेच माकडवाले समाजाचेही याठिकाणी मोठय़ा प्रमाणात मतदान आहे. या प्रभागात यापूर्वी बाळासाहेब वाघमाडे, लतीफ कुरणे, मुन्ना कुरणे आणि शामराव मुळके यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. या प्रभागात यापूर्वी कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या. पण, त्या आणण्याचे काम या माजी नगरसेवकांनी केले आहे. त्यामुळे या प्रभागातील अनेक लोकांच्या तोंडी या माजी नगरसेवकांचे नाव आहे आणि तेही आदराने घेतले जाते. इतकी स्वच्छ प्रतिमा या नगरसेवकांची आहे. याच स्वच्छ प्रतिमेची जबाबदारी घेत त्यांच्याच घरची मंडळी पुन्हा एकदा निवडणुकीला सज्ज झाली आहेत. शामराव मुळके यांनी येथून हॅट्ट्रीक करण्यासाठी निवडणुकीच्या काळात दिवस न् रात्र करत प्रचार केला. आणि त्यांचे तब्येतीकडे दुर्लक्ष झाले आणि त्यातूनच त्यांचे मतदानादिवशी म्हणजे सात जुलै रोजी निधन झाले. आणि ही निवडणूक पुढे गेली. आता त्यांच्या जागी त्यांचे पुत्र प्रकाश मुळके यांनी उमेदवारी दाखल केली आहे. प्रकाश मुळके यांनी याठिकाणी आपल्या वैयक्तिक कार्याद्वारे प्रभागात आपली प्रतिमा निर्माण केली आहे. तसेच शामराव मुळके यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने त्यांना या प्रभागातील खडा न् खडा माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसने या यंग कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने वडर समाजाचे मतदान मोठय़ा प्रमाणात असल्याने याठिकाणी वडर समाजातच दोन्ही उमेदवारी दिली आहे. सुनील कलगुटगी यांनी निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात प्रचार यंत्रणा राबवत या प्रभागात राष्ट्रवादीचे वातावरण चांगलेच तयार केले होते. स्वाभिमानीचे श्रीकृष्ण माळी यांनीही याठिकाणी आपली स्वतंत्र अशी प्रचार यंत्रणा राबवत युवकांच्या सहाय्याने जोरदार तयारी केली होती. आता या दोन्ही उमेदवारांना पुन्हा एकदा ही यंत्रणा नव्याने बांधावी लागणार आहे. महिला गटात याठिकाणच्या विद्यमान नगरसेविका सौ. अनारकली कुरणे यांना हा प्रभाग म्हणजे हक्काचा प्रभाग आहे. त्यामुळे या प्रभागात त्यांनी घर टू घर संपर्क यंत्रणा सुरूच ठेवली आहे. तसेच संगीता वडर यांनीही आपल्या सामाजिक कार्यातून या प्रभागात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. तर उमा वाघमोडे यांनीही या प्रभागात या दोघींच्याबरोबरीने आपली उमेदवारी आहे हे मतदारांच्यापर्यंत पोहोचवले होते. पण, आता पुन्हा एकदा या सर्वांना प्रचार यंत्रणा राबवावी लागत आहे. दहा ते बारा दिवस ही प्रचार यंत्रणा राबविली जाणार आहे आणि या निवडणुकीचे रिंगण गाजणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा