

















सुनील ढोकळे निर्दोष ःन्यायालया बाहेर उत्सुकता व तणाव ः गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार, काहीजण ताब्यात
@इस्लामपूर / प्रतिनिधी
संपूर्ण सांगली जिल्हयाचे लक्ष लागून राहिलेल्या उमेश भिमराव जाधव (34) व महेश भिमराव जाधव (32) या बंधूंच्या खून प्रकरणातील आरोपी माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील त्याचा भाऊ माणिक यांच्यासह बारा आरोपींना सोमवारी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.तर एकजणाची निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश रा. ना. सरदेसाई यांनी ही शिक्षा दिली. इस्लामपूर न्यायालयात एका गुन्हयात इतक्या जणांना शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर मोठी गर्दी होती. गर्दी पागवण्यासाठी पोलिसांनी अधून मधून सौम्य लाठीमार करताना अनेकांना ताब्यात घेतले.
जयवंत आनंदराव पाटील (40) माणिक आनंदराव पाटील (37), गणेश प्रताप उर्फ संजय पाटील, धनाजी लक्ष्मण पाटील, सचिन उर्फ पिंटू प्रताप उर्फ संजय पाटील (35) बबल्या उर्फ इंद्रजित रंगराव पाटील (25), संतोष नारायण कणसे (27), उदय उर्फ खंडया रामचंद्र पवार, उत्तम लक्ष्मण पाटील, देवेंद्र उर्फ देवदत्त जयसिंग पाटील(35) सचिन विजय ढोकळे, सुधाकर राजाराम माने (37), या बाराजणांना खून प्रकरणी दोषी धरून न्यायाधीश सरदेसाई यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. तर सुनील विजय ढोकळे याची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खूनात पंधरा आरोपीचा सहभाग होता. पण सुशांत सुभाष पाटील व अभिमन्यू उर्फ बबल्या बाळासाहेब पाटील हे बालगुन्हेगार असल्याने त्याचवेळी या गुन्हयातून बाहेर पडले होते.
पाच वर्षे दहा महिन्यापूर्वी झालेल्या जाधव बंधूच्या खूनामुळे संपूर्ण वाळवा तालुका हादरून गेला होता. तर सुनावणी सुरू झाल्यापासून या खून खटल्याकडे संपुर्ण जिल्हयाचे लक्ष लागून राहिले होते. ऑक्टोबर 2011 पासून सुरू झालेली ही सुनावणी प्रदिर्घकाळ चालली होती. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांचा यामध्ये समावेश असल्याने सोमवारी निकालाची उत्सुकता ताणली होती. सकाळी आकरा वाजल्यापासूनच न्यायालय परिसरात लोकांनी मोठी गर्दी केली होती. या निकालाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालय इमारतीपासून बऱयाच अंतरावर पोलिसांनी गर्दीला रोखून धरले होते. न्यायालयाच्या इमारतीतही पोलिसांनी लोकांना खात्री करून सोडले होते. न्यायाधीश सरदेसाई यांच्या न्यायदान कक्षात वकील, पत्रकार व जाधव बंधू यांचे नातेवाईक वगळता कुणालाही सोडले नव्हते. जसजसा वेळ सरकेल, तसतशी न्यायदान कक्षाबरोबरच बाहेर गर्दीतही उत्सुकता, हूरहूर व तणाव होता. दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी न्यायाधीश सरदेसाई आसनस्थ झाले. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सुरेश भोसले, फिर्यादी मदार जाधव यांचे वकील ऍड. प्रकाश हिलगे (कोल्हापूर) ऍड. भोसले यांचे असिस्टंट ऍड. आनंद शिर्के हे हजर झाले. बारा वाजून 17 मिनिटांनी आरोपींना न्यायदान कक्षात बोलावून घेण्यात आले. दरम्यान संतोष कणसे याच्यासह जामिनावर असलेले आरोपी बाहेर गर्दीत अडकल्याने आले नव्हते. त्यांना हजर करण्यात आल्यानंतर कामकाजाला सुरूवात झाली.
न्यायाधीश सरदेसाई यांनी सुरूवातीलाच फार्याद व अन्य कागदपत्रांत सुनील ढोकळे याचा अधिक उल्लेख नसल्याने त्याची निर्दोष मुक्तता करीत असल्याचे सांगितले. यावेळी जयवंत व माणिक पाटील हे पिजऱयात उभे होते. तर अन्य दहा आरोपी ओळीने पाठीमागे उभे होते. न्यायाधीश सरदेसाई यांनी बारा जणांना दोषी धरून शिक्षेबद्दल काय सांगायचे आहे का? अशी विचारणा सर्व आरोपींना केली. तेव्हा जयवंत याच्यासह सर्वानीच मानेनेच नकार दर्शवला. यावेळी आरोपींच्या वकीलांनी आरोपींच्या वयाचा व पत्नी-मुलांचा विचार करून कमीत कमी शिक्षा दयावी, तसेच आरोपी जयवंत, माणिक, गणेश, व अन्य आरोपी एकाच कुटुंबातील असल्याने त्याचाही विचार व्हावा, असा युक्तीवाद केला. दरम्यान त्यांनी मागील काही निकालांचे लेखी दाखले दिले. यावेळी सरकारी वकील सुरेश भोसले यांनी हा गुन्हा अपवादात्मक स्वरूपाचा असून भर दिवसा, भर वस्तीत दहशत निर्माण करून दोघा बंधूचे आरोपींनी खून केले आहेत. त्यामुळे त्यांना अधिका-धिक शिक्षा व्हावी असा युक्तीवाद केला. दरम्यान फिर्यादी मंदार यांचे वकील हिलगे यांनी या घटनेवेळी मृत जाधव यांच्या हातात कसलेही शस्त्र नव्हते. दोघेही राष्ट्रीय हॉकी खेळाडू होते. ते सशक्त व कर्ते होते. त्यांच्या खूनामुळे कुटुंबियांना धक्का बसला. दोघांच्या विधवा पत्नी व चार लहान मुले यांच्या पालन पोषणासाठी नुकसान भरपाई मिळाली असा युक्तीवाद केला.
सुनावलेली शिक्षा
न्यायाधीश सरदेसाई यांनी बारा जणांना खूनाच्या गुन्हयाखाली जन्मठेप व प्रत्येकी तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न दिल्यास दोन महिने सक्तमजुरीच्या शिक्षेची तरतूद केली. याशिवाय बेकायदा जमाव जमवणे या गुन्हयाखाली. तीन महिने सक्तमजुरी पाचशे रूपये दंड, दंड न दिल्यास एक महिना साधी कैद धारदारशस्त्रs बाळगल्या प्रकरणी एक वर्षे सक्तमजुरी, पाचशे रूपये दंड, दंड न भरल्या एक महिना साधी कैद,शस्त्रs घेवून दुकानात घुसल्या प्रकरणी एक वर्षे सक्तमजुरी एक हजार रूपये दंड, दंड न दिल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तर जयवंत व माणिक या दोघांना बेकायदा रिव्हॉल्वर बाळगल्याप्रकरणी दोन वर्षे सक्तमजुरी, एक हजार रूपये दंड, व दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा दिली. या दोघांसह गणेश पाटील याला आर्म ऍक्टखाली एक वर्ष सक्तमजुरी एक हजार रूपये दंड व दंड न दिल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा दिली आहे. दरम्यान कट रचल्याच्या आरोपातून बाराही जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. सर्व शिक्षा एकत्रीत भोगावयाची असून कारागृहात भोगलेल्या शिक्षेची सूट देण्यात येणार आहे. न्यायाधीश सरदेसाई यांनी आरोपींना प्रत्येकी तीन हजार रूपये केलेला दंड नुकसान भरपाई म्हणून मृताच्या विधवा पत्नींना देण्याचे आदेश दिले आहेत. तर या गुन्हयातील रिव्हॉल्वर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करून त्याची कायदेशीर विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत.
दोषारोपापासून चौथे न्यायाधीश
या गुन्हयाचे दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायाधीश दिलीप खोत यांच्या न्यायालयात दि. 5 ऑगस्ट 2010 रोजी दाखल झाले. त्यानंतर सुनावणी सुरू होण्यापूर्वी जाधव बंधू यांचे चुलत भाऊ मंदार यांनी हा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. त्यामुळे जिल्हा सहय्यक सरकारी वकील सुरेश पाटील यांच्याकडे या खटल्याची जबाबदारी देण्यात आली त्यांनी काही पंच व साक्षीदारांना तपासले. त्यानंतर खटल्याचे काम बरेच पुढे सरकल्यानंतर त्यांना तडकाफडकी बदलून त्यांच्या जागी सुरेशचंद्र भोसले यांची नियुक्ती केली. त्यानंतर तीन न्यायाधीशांसमोर या खटल्याची सुनावणी चालली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा