गुरुवार, २५ जुलै, २०१३

पुनर्वसन कार्यालयात शेतकरी संघटनेचा राडा

पुनर्वसन अधिकारी कुंभार आणि रघुनाथ पाटील यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक, महसुल कर्मचाऱयांचे जिल्हाभर काम बंद आंदोलन, रघुनाथ पाटील यांच्यासह आठ जणांना ताब्यात घेतले जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती मनिषा कुंभार आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्यात गुरूवारी दुपारी जोरदार शाब्दिक चकमक झाली. यातून शेतकरी संघटनेने या कार्यालयाला टाळेच ठोकण्याचा इशारा देत याठिकाणी जोरदार राडा केला. त्यामुळे पोलीसांनी काही घडण्याच्या आत तातडीने रघुनाथ पाटील आणि त्यांच्या आठ सहकाऱयांना ताब्यात घेतले. अधिकारी आणि कर्मचाऱयांना शिवीगाळ शेतकरी संघटनेकडून झाली त्यामुळे महसुल कर्मचारी संघटनेने तातडीने जिल्हाभर कामबंद आंदोलन सुरू करत या घटनेचा निषेध केला. गुरूवारी दुपारी एकच्या सुमारास शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील हे साखराळे येथील शेतकरी सुरेश श्रीपती जाधव या चांदोली धरणग्रस्ताला 20 वर्षापुर्वी जमीन मिळाली आहे पण ती जमीन मुळ मालक त्यांच्या ताब्यात देत नाही आणि तातडीने ही जमीन या शेतकऱयाला दय़ा यासाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे आले होते. पण त्यावेळी जिल्हाधिकारी तालुका दौऱयावर असल्याने ते निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील यांना भेटले. उत्तम पाटील यांनी याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी कुंभार यांना फोन करून हे काम तातडीने करून द्या असे सांगितले. आणि त्यानुसार रघुनाथ पाटील आणि त्यांचे सहा सात सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयातीलच जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे गेले. रघुनाथ पाटील हे मनिषा कुंभार यांच्या केबीनमध्ये आत गेल्यानंतर तुम्ही न विचारताच कसे आता आला असे रघुनाथ पाटील यांना विचारले. त्यावर पाटील यांनी आम्ही शेतकऱयांच्या कामासाठी आलो आहोत आणि गेल्या चार महिन्यात हा शेतकरी सहा वेळा तुम्ही नसल्यामुळे हेलपाटे मारत आहे. असले प्रकार बंद करा त्यानंतर कुंभार यांनीही रघुनाथ पाटील यांना तुम्ही असे कसे बोलता असे म्हणत वादाला तोंड फोडले. त्यानंतर रघुनाथ पाटील यांनीही आपला तोंडाचा पट्टा सुरू करत तुम्ही जनतेचे नोकर आहात आणि जनतेची कामे तातडीने केली पाहिजे असे सांगितले त्यावर तुम्ही असे बोलू नका, तुम्ही कोणाशी बोलता असे कुंभार यांनी म्हटले असता रघुनाथ पाटील यांनी आपण सभ्यतेनेच बोलत आहोत तुम्हीच उध्दटपणे बोलत आहात असे सांगितल्यावर मग मात्र या पाटील आणि श्रीमती कुंभार यांची जोरदार शाब्दीक चकमक सुरू झाली ही चकमक सोडण्यासाठी महसुलचे कर्मचारी धावले. त्यानंतर पाटील यांनी तुम्ही लोकांची कामे करणार नसाल तर पुनर्वसन कार्यालयाला टाळेच ठोकतो असा इशारा दिला आणि त्यावेळी तातडीने कर्मचाऱयांनी पोलीसांनी बोलविले आणि पोलीसांनी मग रघुनाथ पाटील आणि त्यांच्याबरोबर असणाऱया आठ जणांना ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात ठेवले. दरम्यान हा प्रकार घडताच सर्व उपजिल्हाधिकारी तातडीने जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती मनिषा कुंभार यांच्याकडे आले तसेच महसुल कर्मचारीही याठिकाणी धावले आणि महसुल कर्मचाऱयांनी तातडीने जिल्हाभर कामबंद करण्याचा निर्णय घेत कामबंद आंदोलन सुरू केले. सांयकाळपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरू होते. सांयकाळी सहा पर्यंत रघुनाथ पाटील व त्यांच्या सहकाऱयांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दरम्यान याबाबतची माहिती देताना रघुनाथ पाटील म्हणाले चांदोली धरणांत सुरेश जाधव यांची 20 वर्षापुर्वी जमीन गेली त्यामुळे त्यांच्या वडिलांना आणि चुलत्याला साखराळे येथे 73 गुंठे जमीन शासनाने दिली. शासनाने ही जमीन त्यांच्या नावावर केली आहे. पण ही जमीन प्रत्यक्षात दुसरेच कसतात. त्यामुळे या जमीनीचा ताबा तातडीने दय़ावा यासाठी जाधव यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती मनिषा कुंभार यांच्याकडे तक्रार केली होती. यावर निर्णय देण्यासाठी गेल्या चार महिन्यात कुंभार यांनी पाच तारखा जाधव यांना दिल्या. या पाचही तारखांना कुंभार या हजर नव्हत्या. त्यामुळे या शेतकऱयांला प्रत्येकवेळी या तारखेला येण्यासाठी हजार रूपयांचा दंड सोसावा लागत होता. आणि याबाबत आपण त्यांना माहिती विचारण्यासाठी गेलो असता त्यांनी आपल्यालाच तुम्ही कोण असे उध्दटपणे प्रश्न केला. त्यामुळे ही शाब्दीक चकमक झाली. महसुल कर्मचारी संघटनेने याबाबतची माहिती देताना सांगितले कि रघुनाथ पाटील यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती कुंभार आणि महिला शिपाई यांना धक्काबुकी केली तसेच या ठिकाणच्या महसुल कर्मचाऱयांनाही त्यांनी धक्काबुकी करत प्रशासनाला वेठीस धरत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत महसुल कर्मचारी काम करणार नाहीत. त्यामुळे यापुढील काळात अशा प्रवृत्तींना वेळीच रोखले गेले पाहिजे नाहीतर महसुल कर्मचारी कामबंद करणार असल्याचे स्पष्ट केले. आणि तातडीने कामबंद आंदोलन पेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा