शनिवार, २० जुलै, २०१३

वारणा-कोयनेतून 20 हजार क्यूसेस विसर्ग

वारणा-कोयनेतून 20 हजार क्यूसेस विसर्ग हरिपूर संगमाजवळ पाणी वाढले, आयर्विनजवळ कृष्णेची पाणीपातळी 16 फूटावर कोयना आणि वारणा या दोन्ही धरणांतील पाणीपातळी वाढल्याने या दोन्ही धरणाचे दरवाजे दोन ते अडीच फुटाने उचलल्याने 20 हजार क्युसेसने विसर्ग कृष्णा आणि वारणा नदीत मिसळत आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णेची पाणीपातळी वाढत आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी 16 फूटावर पोहोचली आहे तर परंपरेनुसार बेंदराला कृष्णेची पाणीपातळी वाढते असे मानले जात आहे. दरम्यान पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शिराळा तालुक्यातील रेठरे कोकरूड आणि काखे मांगले हे दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने कोकरूड आणि मांगलेचा संपर्क तुटला आहे. गेल्या चार दिवसांपासून वारणा, कोयना, धोम आणि कण्हेर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाल्याने, धरणाच्या पाण्याच्या पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. त्यामुळे कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. कोयना धरणात सध्या 84.55 टीएमसी पाणीसाठा झाला आहे आणि तो दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे त्या धरणात अडीच फुटाने दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे प्रतिसेकंद 12,500 क्यूसेक्स पाणी कृष्णा नदीत सोडले जात आहे, तर वारणा धरणातही पाण्याची पातळी वाढत चालली आहे. वारणा धरणात 29 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे याठिकाणी शनिवारी दुपारी 12.30 च्या दरम्यान दोन फुटाने दरवाजे उघडण्यात आले आहेत. याठिकाणाहून 5,805 क्यूसेक्स विसर्ग सुरू झाला आहे, याशिवाय या दोन्ही धरणातील पॉवर हाऊससाठी जवळपास अडीच हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होतो. या दोन्ही धरणातून मिळून 20 हजार क्यूसेक्स पाणी वारणा आणि कृष्णा नदीत मिसळले जात आहे. या दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने, वारणा आणि कृष्णा नद्यांची पातळी वाढली आहे. वारणा नदीची पाण्याची पातळी वाढल्याने, शिराळा तालुक्यातील दोन पूल पाण्याखाली गेले आहेत आणि दोन गावांचा संपर्क तुटला आहे. वारणेची पाण्याची पातळी झपाटय़ाने वाढत असल्याने, वारणा काठी असणाऱया लोकांना दक्षता घेण्याचा इशारा जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने, कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढ होत आहे. बहे याठिकाणी साडेआठ फूट, तर ताकारी येथे 20 फूट, भिलवडीत 21 फूट, आयर्विन पूल येथे 16 फूट आणि अंकली येथे 20 फूट पाण्याची पातळी झाली आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाजवळून कृष्णा नदीतून 22,278 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे, तर अंकली येथे तोच विसर्ग 43,610 क्यूसेक्स इतका विसर्ग होत आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोयना येथे 68 मिलीमीटर, महाबळेश्वरमध्ये 24 मिलीमीटर आणि नवजा येथे 58 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वारणा पाणलोट क्षेत्रात 17 मिलीमीटर, तर धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चार मिलीमीटर आणि कण्हेर येथे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हय़ातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने, कृष्णा आणि वारणेला पूर येत आहे. इस्लामपूरमध्ये 19 मिलीमीटर, पलूस सहा मिलीमीटर, तासगाव सहा मिलीमीटर, सांगली 16 मिलीमीटर, मिरज 19 मिलीमीटर, शिराळा 52, विटा एक मिलीमीटर, आटपाडी तीन मिलीमीटर, कवठेमहांकाळ सहा मिलीमीटर, जत पाच मिलीमीटर आणि कडेगाव 11 मिलीमीटर, अशाप्रकारे पावसाची नोंद झाली आहे. ‘वारणा उद्भव’चा फेरप्रस्ताव देणार मदन पाटील ः आयुक्तांना मुदतवाढ नाही ः नगरसेवकच निर्णय घेतीलः नुसत्या घोषणा करणार नाही महाआघाडीने गेल्या पाच वर्षात महापालिकेत काहीही केले नाही. आम्ही ज्या योजना आणल्या त्या गुंडाळण्याचा व त्यांचा प्रवास उलटय़ा दिशेने करण्याचाच प्रयत्न केला. पालिकेत नुसत्या घोषणा करणार नाही तर लोकांना प्रत्यक्ष कामेच दिसतील. सांगली व कुपवाडवासियांसाठी वारणा पाणी उद्भव योजनेचा केंद्राकडे फेरप्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती माजी मंत्री मदन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आयुक्त संजय देगावकर यांच्याबाबत नगरसेवकांच्या मोठय़ा प्रमाणात तक्रारी असून त्यांना मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत नगरसेवक योग्यवेळी निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. उर्वरित वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शनिवारी सांगलीत विजय बंगल्यावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महापालिकेत नवे कारभारी आठ ऑगस्टला येतील. त्यानंतर तेथे खऱया अर्थाने काँग्रेसच्या कामकाजास सुरूवात होईल. गेल्या पाच वर्षात सत्ताधारी म्हणून असलेल्या महाआघाडीने लोकांसाठी काहीही केले नाही. जी वारणा उद्भव पाणी योजना आम्ही आणली. ती योजनाच गुंडाळण्याचा उद्योग या लोकांनी केला. केवळ टाक्या बांधण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही. या योजनेचा उलटय़ा दिशेने प्रवास कसा होईल हाच प्रयत्न केला. वारणा योजनेसाठी 173 कोटी निधी मंजूर आहे. वाढीव निधी देण्याचे शासनाने मान्य केले आहे. त्यामुळे वारणा योजनेचा आम्ही नव्याने फेरप्रस्ताव लवकरच सादर करणार आहोत. महापालिकेच्या माध्यमातून ज्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे, त्यात या योजनेचा समावेश असेल. महापालिकेत नुसत्या घोषणा करणार नाही तर लोकांना कामे दिसतील, असे सांगून मदन पाटील म्हणाले, पालिकेच्या पाणी व ड्रेनेज योजनेला प्राधान्य देण्यात येणार आहे. एलबीटीमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होणार असल्याने शासनाकडे निधीची मागणी तसेच महापालिका व उर्वरित वैधानिक विकास महामंडळ अशी सांगड, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून निधी आणण्याबरोबरच आपण महापालिका क्षेत्रासाठी व जिह्याच्या विकासाला मोठा निधी उपलब्ध करून देणार आहे. आयुक्त देगावकर यांच्याबाबत नगरसेवकांच्या मोठय़ा प्रमाणात तक्रारी आहेत. त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यांच्याबाबत नगरसेवक योग्यवेळी निर्णय घेतील. आम्हीही त्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत, असे स्पष्ट करून मदन पाटील यांनी आयुक्तांना मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध राहणार हे अप्रत्यक्षरित्या सूचित केले. यावेळी माजी महापौर किशोर जामदार, नगरसेवक राजेश नाईक, हणमंत पवार, प्रशांत पाटील मजलेकर, सतीश साखळकर, लक्ष्मण नवलाई आदी उपस्थित होते. गॅसच्या भडक्यात मायलेकींचा अंत भिलवडी स्टेशनमधील घटना पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन येथे गॅसचा भडका उडून मायलेकींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रायक घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आशा बाळासाहेब वीर (50), त्यांची विधवा मुलगी श्रीमती स्वाती मल्लारी घुले (30) हे आपला भाऊ गणेशबरोबर भिलवडी स्टेशन येथे रहात होत्या. सोमवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान आई आशा ही स्वयंपाक घरात गॅसची शेगडी पेटवण्यासाठी गेल्या. शेगडी पेटवताच मोठा भडका उडाला. हा भडका इतका मोठा होता की काही क्षणातच आगीचा डोंब उडाला. आसपासच्या लोकांना ही घटना त्वरीत समजली. शेडमध्ये पाणी भरत असणाऱया गणेशने मोठय़ाने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. मात्र घरातून आगीचे लोळ बाहेर पडताना दिसत होते. दोघींचा वाचवा वाचवा असा आक्रोश सुरू होता. मात्र इतक्या भीषण आगीत कोण जाणार हा प्रश्न होता. अथक परिश्रमानंतर ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. आगीच्या भडक्यात पूर्णपणे भाजलेल्या मायलेकीना सांगलीतील सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास आई आशा तर चार वाजता मुलगी स्वाती यांचे निधन झाले. गॅसच्या भडक्यामुळे संसारोपयोगी साहित्य, कपडे, टीव्ही, धान्य जळून खाक झाले होते. मृत स्वाती यांचे सासर पलूस होते. मात्र दहा वर्षापूर्वी त्यांच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर भिलवडी स्टेशन येथे आपल्या माहेरी रहात होती. तर मृत आशा घुले ही काही वर्षापूर्वी सांगलीतील गावभागात रहात होत्या. मात्र मुलीच्या पतीच्या निधनानंतर त्या भिलवडी स्टेशन येथे सासरी जाण्यासाठी आल्या. या आगीत गणेश हा किरकोळ जखमी झाला आहे. मायलेकींच्या अशा हृदयद्रावक मृत्यूने भिलवडी स्टेशन व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रथमदर्शनी गॅस शेगडी किंवा गॅसची पाईप लिकेज असावी यामुळे हा भडका उडाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तपास एएसआय कदम करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा