सांगली परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील वि†िवध बातम्या, लेख, माहितीसाठी एक उपयुक्त व्यासपीठ... फोन करा 8275592062
गुरुवार, १८ जुलै, २०१३
लोकसभेला जे धोरण तेच विधानसभेला!
@ जतेत राष्ट्रवादी जनसुराज्यच्या मेळाव्यात निर्णय
@ म्हैसाळ संदर्भात जनहीत याचिका दाखल करण्याचा इशारा
@ किरण जाधव / जत
जिल्हय़ातील राजकीय घडामोडींमध्ये बदल घडत असतानाच जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य पक्षानेही प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक घेवून येणाऱया लोकसभा व विधानसभेच्या तयारीची सुरूवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या या उभय पक्षांच्या मेळाव्यात लोकसभेला जे धोरण घेवून काम करू तेच पुढे विधानसभेलाही ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जत येथील साईप्रकाश मंगल कार्यालयात दोनच दिवसापूर्वी तालुक्यातील राष्ट्रवादी व जनसुराज्य या दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप, जनसुराज्यचे नेते बसवराज पाटील, ऍड. बसवराज धोडमणी, ऍड. एम. के. पुजारी, जतचे उपनगराध्यक्ष उमेश सावंत, सभापती बसवराज बिरादार, राजेंद्र कन्नुरे, संजीवकुमार सावंत, यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकाऱयांसह सुमारे 500 अधिक लोक उपस्थित होते.
सांगली महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर जिल्हय़ातील राजकीय समीकरणे गतिमान झाली आहेत. त्याचबरोबर आता तोंडावर आलेल्या लोकसभा, सहकारी संस्थांच्या निवडणुका यामुळे जिह्याचे राजकारण वेग घेत आहे. अशा स्थितीत जतच्या राष्ट्रवादी व जनसुराज्यने प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन इथलेही राजकारण गतिमान केले आहे. कार्यकर्त्यांना रिचार्ज करणे, त्यांच्या अडचणी समजावून घेणे, तालुक्यात विकासकामावर जोर देणे, शासकीय योजनांचा लाभ येत्या काळात अधिक लोकांपर्यंत पोहचविणे या विषयाबरोबरच लोकसभेची रणनीति काय असावी यावरही या बैठकीत मंथन करण्यात आले.
कार्यकर्त्यांच्या मते लोकसभेच्या निवडणुकीत काम करताना जे धोरण ठरले जाईल त्याचप्रमाणे विधानसभेची पॉलिसीही ठेवण्यात यावी, असा सूर आला. लोकसभेनंतर विधानसभेच्या धोरणात बदल करू नये. परंतु, या निवडणुका जतच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असून, याचा अभ्यास करून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, या बैठकीत जत तालुक्याला वरदान ठरणारा म्हैसाळ सहावा टप्पा तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात व्यापक चर्चा घडली. शासन, मंत्री सतत या तालुक्याला भुलवत आहेत. म्हैसाळचा जो सामंजस्य करार झाला आहे, त्या कराराप्रमाणे जतला निधी मिळत नाही. जिथवर पाणी येतेय त्यातही पळवापळवी सुरूच आहे. येनकेन प्रकारे या योजनेच्या बाबतीत जतवर अन्याय केला जात आहे. हा अन्याय असाच सुरू राहिला तर न्यायालयात जनहीत याचिका दाखल करून न्याय मागावा लागेल, असा सूर निघाला.
जत पूर्व भाग पाण्यापासून वंचित आहे. या भागात आता कुठल्याही स्थितीत पाणी आणण्याची गरज आहे. नगारटेक योजना तातडीने मंजूर करून घेणे, त्याचबरोबर कर्नाटक सरकारकडून जतच्या सीमाभागात पाणी आणण्याच्या प्रकल्पाला गती देण्याची आवश्यकता आहे. हे महत्वपूर्ण विषय घेऊन यापुढच्या काळात तालुक्यात काम करावे लागणार आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचनाही दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दिल्या आहेत.
चौकट
जतच्या राजकीय पटलावरील वजीर म्हणून ओळखले जाणारे विलासराव जगताप नेटाने कामाला लागले आहेत. त्यांनी विकासाच्या मुद्दय़ावर व पाणीप्रश्नावर चांगलेच रान उठवले आहे. एखाद्या मुद्दय़ावर ठाम असणारे व राजकारणात कुणाचा मुलाहीजा न बाळगणाऱया विलासरावांनी उद्याच्या राजकारणात कांहीही घडू शकते यादृष्टीने ही बैठक घेऊन अप्रत्यक्षरित्या विधानसभेचा अभ्यास, गोळाबेरीज, राजकीय गणितं याची चाचपणीच सुरू केली आहे. त्यांना बसवराज पाटील भक्कमपणे साथ देत आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा