रविवार, ४ ऑगस्ट, २०१३

जतपूर्वची 42 गावे पाण्यासाठी फोडताहेत टाहो!

@ किरण जाधव / जत हिरेपडसलगीची तुतारी बंद पडल्यानंतर बबलेश्वरचा बिगूल वाजवून जतेच्या पूर्व भागातील 42 गावांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे चालढकल करणाऱया येथील पुढाऱयांसह शासनाला वठणीवर आणण्याचा चंग आता खुद्द नागरिकांनीच बांधला आहे. मागच्या तीन महिन्यापासून जत पूर्वच्या 42 गावांच्या पाणीप्रश्नाची ठिणगी चांगलीच पेटली आहे. उमदीच्या पाणी संघर्ष समितीने यासाठी पुढाकार घेतला असून, कर्नाटकचे पाणी मिळो अगर न मिळो हक्काच्या म्हैसाळ योजनेत 42 गावांचा समावेश झालाच पाहिजे यासाठी पुकारलेल्या आंदोलनाची धार तीव्र झाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा देत मागच्या तीन महिन्यांपासून वेगवेगळय़ा प्रकारचे आंदोलन करणाऱया उमदी पाणी संघर्ष समितीला लोकांचा पाठिंबा वाढतो आहे. एक ऑगस्टला उमदीत झालेला रास्ता रोको, गाव बंद, निषेध मोर्चा आणि नाकर्ते शासनाचे घातलेले श्राद्ध व त्यासाठी उपस्थित झालेल्या पाच हजार जनसमुदायांनी जिह्याचेच नव्हेतर संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले आहे. यापुढचा टप्पा म्हणून नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी 42 गावांमध्ये मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. म्हैसाळ योजनेत जोवर समावेश होत नाही, तोवर या आंदोलनाची दिशा आणखीन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही पुढाऱयाच्या पुढारपणाला बगल देऊन लोकांनी सुरू केलेले हे आंदोलन आता एक व्यापक जनचळवळीच्या दिशेने जाताना दिसते आहे. यामुळे जत पूर्व भागाचा प्रश्न चांगलाच एwरणीवर आला आहे. यावर शासनाला आता तोडगा काढावाच लागेल किंबहुना तो शक्य तितक्या लवकर सोडविण्याची गरजदेखील आहे. कारण दुष्काळी जत तालुक्याला वरदायी ठरणारा म्हैसाळ प्रकल्पाच्या पूर्णत्वाची तिसरी पिढी वाट पाहात आहे. अवघ्या 82 कोटीची योजना शासनाच्या कासव कामकाजामुळे आज दोन हजार कोटींच्या पुढे गेली आहे. खरेतर दुष्काळी भागाला पाण्याचा प्रथम प्राधान्यक्रम देण्याचा विचार व्हायला हवा होता. पण, तसे झालो नाही. उलट राज्याच्या मंत्रीमंडळात ज्याचे वजन अधिक तिथेच सातत्याने मोठा निधी गेला. नदीकाठापासून काही अंतरावर असणारी गावं मागच्या काही वर्षांपासून म्हैसाळचे पाणी पित आहेत. तिथला पीक पॅटर्न बदलला, लोक सुधारले. पण, जिह्याच्या पूर्वेला असणारा जत तालुका पाण्यावाचून तडफडत असतानाही त्यांची जराही कीव येत नाही, इतकेच काय तर या योजनेचा सांमजस्य करारही पाळला जात नाही हे या तालुक्याचे दुर्देवच मानावे लागेल. वास्तविक आज म्हैसाळ कार्यन्वित झाली आहे. किमान येथील 15 ते 20 गावांमध्ये तरी पिण्यापुरते पाणी आले आहे. त्यामुळे या योजनेच्या पूर्णत्वाची वाट बऱयापैकी मोकळी झाल्याचे चित्र आहे. यासाठी गतवर्षभरात जे जतेत जनआंदोलन व सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले त्याला यश आले आहे. परंतू, एवढय़ावर थांबून चालणार नाही. कारण जतेचा पूर्व भाग आजही कोरडा ठणठणीत आहे. घसा भिजला आत्म्याचे काय? जतेचा उंबरठा ओलांडून कृष्णेने प्रवेश केला आहे. तिने नुसता प्रवेश न करता कोरडेला ओलावा देत सांगोल्यापर्यंत पोहोचली आहे. जवळपास 200 किलोमीटरचा प्रवास करून कृष्णा सांगोला मंगळवेढय़ापर्यंत जातेय. मग, जतेच्या पूर्व भागातील 42 गावांपर्यंत का पोहोचत नाही, असा संतप्त सवाल या आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. जतेचा घसा ओला करणारी ही योजना आत्म्यापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. ज्या 42 गावांना धड कर्नाटकातूनही पाणी येत नाही किंबहुना तो प्रश्न दोन राज्यांचा असल्याने तो फार लवकर सुटले असे अजिबात नाही. त्यामुळे मुळ व हक्काच्या म्हैसाळ योजनेत या गावांचा समावेश करावा ही मागणी पुढे आली आहे. आंदोलनाची सुरूवात शिव बसव जयंतीपासून उमदीच्या पाणी संघर्ष समितीने हे आंदोलन पुकारले. येथील कार्यकर्ते सुनील पोतदार, अनिल शिंदे, सुभाष कोकळे, हणमंत दुधगी यांनी या प्रश्नाची जागृती केली. दर महिन्याच्या एक तारखेला उमदीत निषेध सभांचे आयोजन केले. जतच्या पूर्व भागात पाणी आले पाहीजे हा विचार रूझविला. त्यामुळे एकेक गावातून चांगला प्रतिसाद मिळत गेला. पहिल्या टप्यात 12 गावांनी येणाऱया लोकसभा व विधानसभेवर बहिष्कारचा निर्णय घेतला. त्यानंतर विविध आंदोलने करून राज्य शासनाचे लक्ष वेधण्याची भूमिका चालविली आहे. पूर्वभागात भीषण दाहकता जत पूर्व भागाची दाहकता खूप मोठी आहे. ज्या भागातील जमिनी चांगल्या आहेत. शेतकरी मोठे आहेत. निसर्गाशी दोन हात करून जिद्दीने राबणारा येथील बळीराजा पाण्याअभावी मात्र हतबल झाला आहे. शंभर एकराचा शेतकरी उसाच्या फडावर जातोय. गावंच्या गावं उठण्याची वेळ आली आहे. चार वर्षात पावसाचा थेंब नाही. पाण्याची पातळी हजारो फुटावर गेली आहे. बागा उद्धवस्त झाल्या. जनावरं कसाबाच्या दावणीला चालली. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती तर नित्याचीच बनली आहे. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू असताना मायबाप सरकार मात्र त्यांना नव्या अश्वासनाशिवाय काहीच देत नाही. मध्यंतरी हिरेपडसलगीचा विषय पुढे आणला. त्यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्नही केले. मुख्यमंत्र्यांनी दहा कोटीची घोषणा केली. या दहा कोटीतील दमडीही मिळाली नाही, तोवर बबलेश्वरचा बिगूल वाजविण्यात आला. परंतू, ज्या योजना कल्पनेच्या पलिकडेच्या आहेत. शिवाय तो दोन राज्यांचा प्रश्न आहे. तिकडे कर्नाटक अतिरिक्त पाण्याची मागणी करून हा विषय पुढे ढकलतोय, अशा योजनांच्या मागे लागून वेळ ढकलण्याचा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. ही भावना पूर्व भागातील जनतेची झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न आता चांगलाच धुमसतोय. क्रांतीदिनी मशाल रॅली एक ऑगस्टला सुमारे हजारो लोकांनी उमदीत रास्तो रोको करून शासनाचे श्राद्ध घातले. आता पुढचा टप्पा म्हणून नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी 42 गावांमध्ये मशाल रॅली काढण्यात येत आहे. त्यादिवशी शासनाच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत. निवृत्ती शिंदे, सुनील पोतदार, अनिल शिंदे, सुभाष कोकळे, सुरेश कल्लोळी, मल्लय्या मठपती, चंद्रय्या मठ, राजू धोत्री, चिदानंद रगटे, बाळू शिंदे, सिद्धलिंगय्या पाटील, दावल शेख, महंमद कलाल, आण्णा भुयार, मलकारी वायचळ, तांबोळी गुरूजी, राजकुमार येळमळी, बाबू वागदरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी गट तयार करून या रॅलीचे आयोजन केले आहे. त्यानंतर निषेध सभा घेवून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा