सांगली परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील वि†िवध बातम्या, लेख, माहितीसाठी एक उपयुक्त व्यासपीठ... फोन करा 8275592062
सोमवार, ५ ऑगस्ट, २०१३
एक होते भगवानदादा!
भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान ऊर्फ भगवानदादा यांची एक ऑगस्ट ही जन्मशताब्दी. मध्यमवर्गीय मराठी घरात जन्मलेल्या भगवानदादांचं आयुष्य एक दंतकथा वाटावं असंच होतं. चित्रपटाच्या वेडापायी दादांनी चौथी इयत्तेमध्येच शाळेला रामराम ठोकला आणि स्टुडिओचा रस्ता धरला. तो जमाना होता मूकपटांचा. परंतु, चित्रपटांत काम मिळणं सोपं नव्हतं. त्या काळातील अभिनेते मास्टर विठ्ठल हे भगवानदादांचं दैवत. त्यामुळे चित्रपटात स्टंटबाजी, फाइट सीन्स करायची स्वप्नं पाहत भगवानदादांनी आपल्या शरीरावर, व्यायामावर मेहनत घ्यायला सुरवात केली.
त्यांना रजतपटावर सर्वप्रथम चमकण्याची संधी मिळाली, ती 1930 मध्ये निर्माता सिराज अली हकीम यांच्या "बेवफा आशिक' या मूकपटामध्ये. मात्र हा चित्रपट यशस्वी होऊनही या चित्रपटानंतर आठ-नऊ महिने भगवानदादांना नवे चित्रपट मिळण्यासाठी स्ट्रगल करावा लागला होता. आणखी काही मूकपटांमध्ये त्यांनी कामे केली. भगवानदादांचा पहिला बोलपट होता, "हिम्मत-ए-मर्दा.' नंतरच्या काळात भगवानदादा लोकप्रिय अभिनेता तर बनलेच; शिवाय त्यांनी चित्रपटनिर्मिती आणि दिग्दर्शन यामध्येही नाव कमावले. आपल्या "जागृती पिक्चर्स' या चित्रपट संस्थेद्वारा त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. इतकंच
नाही, तर त्यांनी चेंबूर परिसरात स्वतःचा "जागृती' स्टुडिओ उभारला होता.
चित्रपटनिर्मिती -अभिनय यांद्वारा भगवानदादांनी भरपूर पैसे कमावले. त्या काळात जुहू चौपाटी परिसरात त्यांचा 25 खोल्यांचा बंगला होता आणि आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वेगळी, असा सात गाड्यांचा ताफा त्यांच्याकडे होता. मात्र, हे दिवस बदलायला वेळ लागला नाही. "अलबेला' हा सुपरहिट चित्रपट बनवल्यानंतर भगवानदादांनी "लाबेला', "झमेला' या चित्रपटांची निर्मिती केली; पण हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पार गारद झाले. किशोरकुमारला घेऊन बनवीत असलेल्या "हसते रहना' या चित्रपटाची निर्मिती करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, की चित्रपटाचे नाव "हसते रहना' असले, तरी त्यांच्यावर रडायची पाळी आली. कारण या चित्रपटासाठी त्यांनी आपली सर्व बचत, बायकोचे दागिने खर्च केले; एवढे करूनही चित्रपट पूर्ण झालाच नाही. आणि काही काळातच बंगला, गाड्या विकून भगवानदादा दादर टी. टी. येथील दोन खोल्यांच्या चाळीत राहू लागले. एके काळी जेवणाच्या, दारूच्या पार्ट्यांसाठी त्यांच्या बंगल्यात जमत असलेली मंडळी, ते कफल्लक झाल्यावर त्यांना भेटीनाशी झाली. मग भगवानदादांनी चित्रपटात साइड रोल, छोट्या भूमिका करायला सुरवात केली. मात्र, त्यांच्या मद्यपानाच्या सवयीमुळे अनेक निर्माते पैशांऐवजी दारूच्या बाटल्या देऊन त्यांची बोळवण करीत असत. मात्र, भगवानदादांसारखे नृत्य करता यावे, म्हणून अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, गोविंदा हे कायम धडपडत राहिले.
फार कमी लोकांना माहिती असेल, की भगवानदादा हे उत्तम ज्योतिषी होते. अत्यंत श्रीमंती थाटात राहिलेल्या भगवानदादांनी दोन खोल्यांमध्ये राहणेही तितक्याच सहजतेने स्वीकारले होते. सुनील दत्त, ओमप्रकाश, राजेंद्रकृष्ण, सी. रामचंद्र आदी चित्रपटसृष्टीतील फार कमी लोकांनी निर्धन झालेल्या भगवानदादांशी संपर्क ठेवला होता. दिलीपकुमार गाडीतून दादर टी.टी.च्या रस्त्यावरून जात, त्या वेळी भगवानदादांच्या चाळीजवळ गाडी आल्यावर मोठ्याने गाडीचा हॉर्न वाजवत आणि भगवानदादांना हात करीत असत.
आज भगवानदादा जाऊन 11 वर्षे झाली, तरीही त्यांचे विनोदी चित्रपट, त्यांची नृत्यशैली, "अलबेला' चित्रपटातील गाणी रसिकांच्या मनात ताजी आहेत. प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांना गीतकार म्हणून पहिला ब्रेक भगवानदादांनी दिला होता. त्यांच्या "भला आदमी' या चित्रपटाच्या नामवलीमध्ये आपले नाव पाहिल्यावर आनंद बक्षी यांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू आले होते. पुढे बक्षींना बऱ्यापैकी नाव मिळाल्यावर भगवानदादांना ते एका फिल्मी पार्टीमध्ये भेटले, त्या वेळी दादा बक्षींना म्हणाले होते, ""बक्षीसाहेब, या चित्रपटसृष्टीमध्ये नाव नाही, तर काम माणसाला जिवंत ठेवतं.'' आणि म्हणूनच भगवानदादा त्यांच्या चित्रपटांद्वारा, नृत्यशैलीमुळे आजही जिवंत आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा