शुक्रवार, २६ जुलै, २०१३

कारगिल युद्धाचे 14 वर्ष, चार हजार पाकिस्तानींना मारून रचली वीरगाथा

कारगील युद्धाला आज (शुक्रवार) १४ वर्ष पूर्ण झाले आहेत. परंतु, तरीही या युद्धाची वीरगाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात तेवढीच जीवंत आहे. पाकिस्तानी लष्कराचे जवान मे १९९९ मध्ये कारगिल सेक्टरमध्ये घुसखोरांच्या रुपात आले. त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या भारतीय सीमा चौकींवर कब्जा केला. पाकिस्तानी लष्कराला भारतीय भूमिवरून हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय सुरू केले. यात भारतीय लष्कराचे सुमारे ३० हजार जवान सहभागी झाले. भारतील लष्कराला मदत करण्यासाठी भारतीय हवाई दलाने २६ मे रोजी ऑपरेशन पांढरा समुद्र सुरू केले. भारतीय नौदलाने समुद्रमार्गे पाकिस्तानला मिळणारी मदत रोखण्यासाठी पश्चिम किनारपट्टीवर महत्वाची जहाजे तैनात केली. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येकवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. जगभरात उंच पर्वतांमध्ये झालेल्या युद्धांपैकी कारगिल युद्ध एक ताजे उदाहरण आहे. १९६९ मध्ये चीन आणि सोवियत संघराज्य यात झालेल्या संघर्षानंतर अण्वस्त्रसज्ज असलेल्या दोन देशांमध्ये जमीनीवर झालेले हे दुसरे युद्ध होते. या युद्धात दोन्ही देशांच्या लष्कराचे मोठे नुकसान झाले. सुरवातील पाकिस्तानने दावा केला होता, की त्यांचे केवळ ३७५ जवान ठार झाले आहेत. परंतु, नंतर स्पष्ट झाले, की पाकिस्तानचे किमान चार हजार जवान या युद्धात मारले गेले. भारतीय लष्करातील ५४३ अधिकारी आणि जवानांना या युद्धात वीरमरण आले तर सुमारे १३०० जवान जखमी झाल्याचे समजते. केवळ एका भारतीय जवानाला पाकिस्तानी लष्कराने पकडले होते. त्याचीही नंतर सुटका करण्यात भारताला यश आले. कारगिल युद्धात ठार झालेल्या भारतीय जवानांचा वयोगट १९ ते ३५ असा होता. ले. सौरभ कालिया यांच्यावर झालेल्या हल्ल्याने घुसखोरीची मिळाली होती माहिती कारगिल युद्धात अतिशय क्रुरपणे ठार मारलेल्या लेफ्टनंट सौरभ कालिया यांचे नाव आजही भारतीयांच्या जीभेवर आहे. मे १९९९ रोजी एका स्थानिक मेंढपाळाकडून मिळालेल्या माहितीनंतर बटालिक सेक्टरमध्ये लेफ्टनंट सौरभ कालिया आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर गेले होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामुळे तेथील घुसखोरी उजेडात आली. सुरवातील ही घुसखोरी दहशतवाद्यांची घुसखोरी असावी असे भारतीय लष्कराला वाटले होते. त्यामुळे त्यांना तेथून हुसकावून लावण्यासाठी काहीच जवान पाठविण्यात आले होते. परंतु, पाकिस्तानी जवानांनी दिलेले प्रत्युत्तर आणि इतरही भागांमध्ये अशा स्वरूपाच्या घटना घडत असल्याचे समजल्यावर घुसखोरी पाकिस्तानी लष्कराने केल्याचे उघडकीस झाले. पाकिस्तानी लष्कराने कालिया यांनी पकडून अतिशय क्रुरपणे ठार मारले. त्यांचे शारीरिक खच्चीकरण केलेले पार्थिव भारताला सोपविले. सौरभ यांचे वडील आजही त्यांच्या हत्येला दोषी असलेल्यांना शिक्षा होण्यासाठी मोठा संघर्ष करीत आहेत. बत्रा यांनी सांगितले होते, की विजयी ध्वज रोवून त्यात लपेटून येईल कारगिल युद्धात शहिद झालेले कॅफ्टन विक्रम बत्रा यांचे सहकारी त्यांना शेरशाह असे म्हणत. केवळ १८ महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात भरती झालेले बत्रा त्यांच्या ऐतिहासिक संदेशासाठी स्मरणात राहतात. बत्रा यांनी युद्धावर जाण्यापूर्वी सांगितले होते, की भारताचा विजयी ध्वज रोवून परत येईल किंवा त्यात लपेटून येईल. त्यांच्या कंपनीला पॉईंट ५१४० पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यातून परत घेण्याचा आदेश मिळाला होता. त्यांनी शत्रूची दिशाभुल करण्यासाठी शिखराच्या दुसरीकडून चढण्याची योजना आखली होती. त्यात त्यांना यश आले. बत्रा यांनी पाकिस्तानी लष्कराच्या तीन जवानांना ठार मारले. परंतु, या लढाईत ते जखमी झाले. तरीही ते लढत राहिले. २० जून १९९९ रोजी सकाळी ३.३० वाजता त्यांच्या कंपनीने शिखर ताब्यात घेतले. शिखर ताब्यात आल्यावर बत्रा म्हणाले होते, की ये दिल मांगे मोर. त्यांच्या याच शब्दांमध्ये त्यांची विरता दडलेली आहे. ८ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने एेतिहासीक यश मिळवित १६ हजार फूट उंचिवर असलेले ४८७५ शिखर परत मिळविले. परंतु, या मोहिमेत कॅप्टन बत्रा कामी आले. विमानातून पाकिस्तानी भूमिवर उतरलेले नचिकेत यांना पाकिस्तानने पकडले होते कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराने केवळ एका भारतीय जवानाला पकडले होते. त्यांचे नाव फ्लाईट लेफ्टनंट के. नचिकेत असे आहे. २७ मे १९९९ रोजी नचिकेत यांनी बटालिक सेक्टरमध्ये शत्रू पक्षाच्या चौक्यांवर मिग-२७ लढाऊ विमानातून तुफान गोळीबार केला. यावेळी काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचे विमान खाली पडले. यावेळी नचिकेत यांनी स्वतःला विमानातून इजेक्ट केले. परंतु, दुर्दैवाने ते पाकिस्तानी लष्कराला सापडले. नचिकेत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाला मागच्या बाजूने अचानक धक्का लागला. विमानाची गती एकदम ५०० किलोमीटर प्रति तास झाली. यावेळी विमानाच्या इंजिनला आग लागली. मी तत्काळ रॉकेट पॅड फेकून दिले. पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्कॉड्रन लिडर यांना सांगून विमानाची गती राखण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अयशस्वी राहिला. त्यामुळे नचिकेत यांना विमान सोडून इजेक्ट व्हावे लागले. त्यानंतर त्यांचे विमान एका शिखरावर आदळले. नचिकेत खाली उतरल्यावर त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तुलातून प्रत्युत्तर दिले. परंतु, काही काळ चकमक झाल्यावर पाकिस्तानी जवानांनी त्यांना पकडले. त्यांना शारीरिक त्रास देऊन त्यांच्याकडून भारतीय लष्कराची गोपनीय योजना माहित करून घेण्याचा पाकिस्तानी लष्कराने प्रयत्न केला. परंतु, नचिकेत यांनी त्यांना काहीही सांगितले नाही. युद्ध संपल्यावर नचिकेत यांना पाकिस्तानने सोडून दिले. १५ मीटर अंतरावरून शत्रूशी लढत होते विजयंत थापर भारतीय लष्कराच्या राजपूताना रायफल्समध्ये असलेले कॅप्टन विजयंत थापर यांना कारगिल युद्धात डर्टी डजन या १२ सदस्यीय टीमचे प्रमुख करण्यात आले होते. त्यांच्याकडे टोलोलिंग शिखर सर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. १२ जून १९९९ च्या रात्री विजयंत यांनी त्यांच्या प्लाटूनला लीड केले. टोलोलिंग सर केल्यानंतर त्यांना पिंपल्स आणि नॉल सर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास त्यांनी कठीण पर्वत चढून शत्रूच्या चौकीजवळ ठाण मांडला. शत्रूच्या चौकीवर जोरदार हल्ला केला. त्यांनी केवळ १५ मीटर अंतरावरून पाकिस्तानी जवानांवर बेछुट गोळीबार केला. त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या अनेक जवानांचा खातमा केला. यात त्यांना वीरमरण आले. बॅटल ऑफ थ्री पिंपल्समध्ये त्यांना शिखर ताब्यात घ्यायचे होते. विजयंत यांच्या प्लाटूनचे कमांडर मेजर पी. आचार्य शहिद झाले तेव्हा त्यांनी कमांड आपल्या हातात घेतली. २२ वर्षांचे विजयंत केवळ काही महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांना मरणोपरांत वीरचक्र बहाल करण्यात आले. पाकिस्तानी चौकीवर हल्ला करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कुटुंबाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, की जर तुम्हाला शक्य असेल तर येथे येवून बघा तुमच्या भविष्यासाठी भारतीय लष्कराने कुठे युद्ध लढले. विजयंत यांचे वडील निवृत्त कर्नल वी. एन. थापर प्रत्येक वर्षी हजारो मैलांचा प्रवास करून मुलगा जेथे शहिद झाला होता तेथे जातात. मुलाला श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्याने दिलेला शब्द पाळण्यासाठी ते असे करतात.

गुरुवार, २५ जुलै, २०१३

पुनर्वसन कार्यालयात शेतकरी संघटनेचा राडा

पुनर्वसन अधिकारी कुंभार आणि रघुनाथ पाटील यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक, महसुल कर्मचाऱयांचे जिल्हाभर काम बंद आंदोलन, रघुनाथ पाटील यांच्यासह आठ जणांना ताब्यात घेतले जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती मनिषा कुंभार आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्यात गुरूवारी दुपारी जोरदार शाब्दिक चकमक झाली. यातून शेतकरी संघटनेने या कार्यालयाला टाळेच ठोकण्याचा इशारा देत याठिकाणी जोरदार राडा केला. त्यामुळे पोलीसांनी काही घडण्याच्या आत तातडीने रघुनाथ पाटील आणि त्यांच्या आठ सहकाऱयांना ताब्यात घेतले. अधिकारी आणि कर्मचाऱयांना शिवीगाळ शेतकरी संघटनेकडून झाली त्यामुळे महसुल कर्मचारी संघटनेने तातडीने जिल्हाभर कामबंद आंदोलन सुरू करत या घटनेचा निषेध केला. गुरूवारी दुपारी एकच्या सुमारास शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील हे साखराळे येथील शेतकरी सुरेश श्रीपती जाधव या चांदोली धरणग्रस्ताला 20 वर्षापुर्वी जमीन मिळाली आहे पण ती जमीन मुळ मालक त्यांच्या ताब्यात देत नाही आणि तातडीने ही जमीन या शेतकऱयाला दय़ा यासाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे आले होते. पण त्यावेळी जिल्हाधिकारी तालुका दौऱयावर असल्याने ते निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील यांना भेटले. उत्तम पाटील यांनी याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी कुंभार यांना फोन करून हे काम तातडीने करून द्या असे सांगितले. आणि त्यानुसार रघुनाथ पाटील आणि त्यांचे सहा सात सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयातीलच जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे गेले. रघुनाथ पाटील हे मनिषा कुंभार यांच्या केबीनमध्ये आत गेल्यानंतर तुम्ही न विचारताच कसे आता आला असे रघुनाथ पाटील यांना विचारले. त्यावर पाटील यांनी आम्ही शेतकऱयांच्या कामासाठी आलो आहोत आणि गेल्या चार महिन्यात हा शेतकरी सहा वेळा तुम्ही नसल्यामुळे हेलपाटे मारत आहे. असले प्रकार बंद करा त्यानंतर कुंभार यांनीही रघुनाथ पाटील यांना तुम्ही असे कसे बोलता असे म्हणत वादाला तोंड फोडले. त्यानंतर रघुनाथ पाटील यांनीही आपला तोंडाचा पट्टा सुरू करत तुम्ही जनतेचे नोकर आहात आणि जनतेची कामे तातडीने केली पाहिजे असे सांगितले त्यावर तुम्ही असे बोलू नका, तुम्ही कोणाशी बोलता असे कुंभार यांनी म्हटले असता रघुनाथ पाटील यांनी आपण सभ्यतेनेच बोलत आहोत तुम्हीच उध्दटपणे बोलत आहात असे सांगितल्यावर मग मात्र या पाटील आणि श्रीमती कुंभार यांची जोरदार शाब्दीक चकमक सुरू झाली ही चकमक सोडण्यासाठी महसुलचे कर्मचारी धावले. त्यानंतर पाटील यांनी तुम्ही लोकांची कामे करणार नसाल तर पुनर्वसन कार्यालयाला टाळेच ठोकतो असा इशारा दिला आणि त्यावेळी तातडीने कर्मचाऱयांनी पोलीसांनी बोलविले आणि पोलीसांनी मग रघुनाथ पाटील आणि त्यांच्याबरोबर असणाऱया आठ जणांना ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात ठेवले. दरम्यान हा प्रकार घडताच सर्व उपजिल्हाधिकारी तातडीने जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती मनिषा कुंभार यांच्याकडे आले तसेच महसुल कर्मचारीही याठिकाणी धावले आणि महसुल कर्मचाऱयांनी तातडीने जिल्हाभर कामबंद करण्याचा निर्णय घेत कामबंद आंदोलन सुरू केले. सांयकाळपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरू होते. सांयकाळी सहा पर्यंत रघुनाथ पाटील व त्यांच्या सहकाऱयांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दरम्यान याबाबतची माहिती देताना रघुनाथ पाटील म्हणाले चांदोली धरणांत सुरेश जाधव यांची 20 वर्षापुर्वी जमीन गेली त्यामुळे त्यांच्या वडिलांना आणि चुलत्याला साखराळे येथे 73 गुंठे जमीन शासनाने दिली. शासनाने ही जमीन त्यांच्या नावावर केली आहे. पण ही जमीन प्रत्यक्षात दुसरेच कसतात. त्यामुळे या जमीनीचा ताबा तातडीने दय़ावा यासाठी जाधव यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती मनिषा कुंभार यांच्याकडे तक्रार केली होती. यावर निर्णय देण्यासाठी गेल्या चार महिन्यात कुंभार यांनी पाच तारखा जाधव यांना दिल्या. या पाचही तारखांना कुंभार या हजर नव्हत्या. त्यामुळे या शेतकऱयांला प्रत्येकवेळी या तारखेला येण्यासाठी हजार रूपयांचा दंड सोसावा लागत होता. आणि याबाबत आपण त्यांना माहिती विचारण्यासाठी गेलो असता त्यांनी आपल्यालाच तुम्ही कोण असे उध्दटपणे प्रश्न केला. त्यामुळे ही शाब्दीक चकमक झाली. महसुल कर्मचारी संघटनेने याबाबतची माहिती देताना सांगितले कि रघुनाथ पाटील यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती कुंभार आणि महिला शिपाई यांना धक्काबुकी केली तसेच या ठिकाणच्या महसुल कर्मचाऱयांनाही त्यांनी धक्काबुकी करत प्रशासनाला वेठीस धरत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत महसुल कर्मचारी काम करणार नाहीत. त्यामुळे यापुढील काळात अशा प्रवृत्तींना वेळीच रोखले गेले पाहिजे नाहीतर महसुल कर्मचारी कामबंद करणार असल्याचे स्पष्ट केले. आणि तातडीने कामबंद आंदोलन पेले आहे.

सांगली पूर दि. 25 जुलै 2013

बुधवार, २४ जुलै, २०१३

‘सर्वोदय’ पाच लाख टन गाळप करेल- शिंदे

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना या गळीत हंगामामध्ये सर्वोदय सहकारी साखर कारखान्यात पाच लाख मेट्रीक टन उसाचे गाळप निश्चितपणे करेल, असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बांधकाम समितीचे सभापती विराजदादा शिंदे यांनी व्यक्त केले. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्वावर चालवित असलेल्या कारंदवाडी येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पूजन समारंभ प्रसंगी शिंदे बोलत होते. प्रारंभी शिंदे यांच्या हस्ते धार्मिक विधीने रोलर पूजन करण्यात आली. तसेच त्यांच्या हस्ते कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सर्वोदय साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री संपतराव पाटील, भगवान पाटील, रमेश हाके, दिनकर पाटील, जानकास ढोले, कमल जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रोलर पूजन करण्यात आले. शिंदे पुढे म्हणाले, या गळीत हंगामासाठी शेतकऱयांच्याकडून उसाची नोंद चांगली झाली आहे. तसेच उस तोडणी व वहातूक करार करण्यात आले आहेत. ऑफ सिझनमधील करावयाची कामे गतीने सुरू आहेत. उस उत्पादक सभासद व शेतकऱयांच्या सहकार्याने आम्ही या युनिटमध्ये यशस्वीपणे पाच लाख मेटीक टनाचे गाळप करू. राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक श्रेणीक कबाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी आभार मानले. याप्रसंगी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री एल. बी. माळी, मेघा पाटील, कामगार नेते शंकरराव भोसले, जनरल मॅनेजर एस. डी. कोरडे, कामगार युनियन अध्यक्ष तानाजी खराडे, कामगार संचालक मोहनराव शिंदे, राजेंद्र चव्हाण, आष्टयाचे कार्यकर्ते रघुनाथ जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वोदय चिफ इंजिनिअर विजय मोरे, चिफ केमिस्ट उमेश शेटे, सुशिल भंडारे, बाबासो चौगुले, विजय पाटील, सुधाकर पाटील, बाबासो चौगुले व त्याच्या सहकाऱयांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

मर्त्य-अमर्त्य

नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये नागरिकांच्या गरजा भागवल्या हे मान्य करावे लागेल. मात्र संशयास्पद प्रतिमेमुळे ते पंतप्रधानपदास लायक नाहीत, असे डॉ. सेन यांना वाटते. असे असेल तर मग मनमोहन सिंग यांच्या धोरणलकव्याचे समर्थन ते कसे करतात? गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाचा फुगा प्रसारमाध्यमांनी फुगवला या विख्यात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या मतात तथ्य आहे. मोदी हे पंतप्रधान होता नये कारण त्यांची निधर्मी प्रतिमा संशयास्पद आहे, असेही सेन म्हणाले. ताज्या मुलाखतीत सेन यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांचा कथित पंतप्रधानपदाचा दावा याबाबत विस्तृत मतप्रदर्शन केले. तिची दखल घेणे गरजेचे आहे. मोदी यांच्याबाबतची हवा तापवली गेली त्यास अर्थविषयक नियतकालिकांच्या गुंतवणूकस्नेही धोरणाचा भाग होता, हे नि:संशय. परंतु तसे होण्यामागे आणखीही एक कारण आहे. त्याचा किती विचार सेन यांनी केला, हे समजण्यास मार्ग नाही. मोदी यांच्या कामगिरीचा उदोउदो होण्यास सुरुवात झाली ती आसपासचे अन्य मुख्यमंत्री निकम्मे ठरू लागले म्हणून. या शून्य कारभाराबाबत काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांशी स्पर्धा कोणी करू शकणार नाही. मग ते राजस्थानचे अशोक गेहलोत असोत किंवा महाराष्ट्राचे अशोक चव्हाण आदी अन्य मुख्यमंत्री असोत. या आणि अन्य राज्यांतील व्यापक अंधारामुळे मोदी यांची ठसठशीत चिमणी डोळे दिपवणारी ठरली, हे आपण मान्य करावयास हवे. तेव्हा मोदी यांची तुलना करण्यासाठी कार्यक्षम असा अन्य कोणी नसल्यामुळे अकार्यक्षमांच्या भाऊगर्दीत हा काहीतरी करून दाखवणारा उजवा ठरला. ज्या काळात अन्य राज्यांत पाऊल टाकण्यास उद्योगपती धजावत नव्हते त्या काळात मोदी यांच्या गुजरातेत या मंडळींची रीघ लागत होती आणि गुंतवणुकीची स्पर्धाच सुरू होती. त्याचे अतिउदात्तीकरण झाले, हेही मान्य. मोदी यांच्या दौलतजादामुळे सरकारी सवलतींना चटावलेला आणि सरकारच्या पदराआडून आपले उद्योग सांभाळणारा मोठा वर्ग मोदी यांचे गुणगान करू लागला, हेही सत्यच आहे. या उद्योगपतींनी अनेक व्यावसायिक वृत्तवाहिन्या वा दूरचित्रवाणी वाहिन्यांत गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे तेथून मोदी यांची आरती सकाळसंध्याकाळ सुरू राहिली आणि मोदी यांच्याभोवती कार्यक्षमतेचे मोठे वलय तयार झाले. अशा वेळी इतरांच्या भ्रष्ट आणि अकार्यक्षम कामगिरीस विटलेल्या जनतेस मोदी यांच्या रूपात पर्याय उभा राहताना दिसला. तेव्हा मोदी यांच्या उदात्तीकरणासाठी माध्यमांना दोष देताना त्याच वेळी अन्य अकार्यक्षमांचे पापही तितक्याच पोटतिडिकीने त्यांच्या त्यांच्या पदरात घालावयास हवे. सेन ते करताना दिसत नाहीत. त्यामुळे केवळ माध्यमांना दोष देऊन त्यांना स्वत:च्या कर्तव्यच्युतीतून सुटका करून घेता येणार नाही. शिवाय, वेळच्या वेळी हवी तेव्हा वीज, मुलाबाळांना शिकण्यासाठी चांगल्या शाळा, त्या शाळेपर्यंत पोहोचवणारे चांगले आणि सुरक्षित रस्ते याच गरजा कोणत्याही नागरिकासाठी महत्त्वाच्या असतात. त्या जर पुरवल्या जात असतील तर त्या पुरवणारा नेता निधर्मी आहे किंवा काय याचा विचार नागरिक करीत नाहीत, हे वास्तव आहे. आणि हे आपल्याकडेच होते असे नाही. लोकशाही अगदी खोलवर मुरलेल्या अमेरिकेसारख्या देशातही जॉर्ज बुश यांच्यासारखा वैचारिकदृष्टय़ा उनाड गृहस्थ एकदा नव्हे तर दोनदा अध्यक्षपदी विराजमान होऊ शकला तो अमेरिकी नागरिकांना दाखवण्यात आलेल्या सुखस्वप्नांमुळे. अमेरिकी नागरिकांच्या संपत्तीत वाढ करणे आणि त्यांचे कर कमी करणे या आश्वासनांवर बुश निवडून आले. तेथील जनतेसाठी हे जास्त महत्त्वाचे होते. त्यामुळे अध्यक्षपदी निवडून आल्यावर व्हाइट हाउसमधे बायबलचे धडे त्यांनी सुरू केले याबद्दल सर्वसामान्यास त्याचे काही सोयरसुतक नव्हते. अशा वेळी मोदी हे धर्मवादी आहेत की निधर्मी या चर्चेत रस असलाच तर तो आहे सेन यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ आणि स्टुडिओविलसित विचारवंतांना. हे दुर्दैवी असले तरी वास्तव आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. तथापि सेन यांच्या विधानाचा समाचार घेण्याचे आणखी एक कारण आहे. काँग्रेसशासित सरकार, त्या सरकारचा गेल्या काही वर्षांचा धोरणलकवा आणि त्यातून जन्माला आलेले अनर्थकारण याच्याशी हे कारण संबंधित आहे. गेले काही महिने सेन हे मनमोहन सिंग सरकारच्या खाद्यान्न सुरक्षा योजनेचे कडवे समर्थक बनले आहेत. त्यांचे म्हणणे असे की नुसत्या आर्थिक विकासाने समाज पुढे जात नाही. त्या जोडीला गरिबांसाठीच्या सामाजिक योजनांचीही गरज असते. या विचारातून मोदी यांचे विकासाचे प्रारूप सेन यांना निरुपयोगी वाटते. जगदीश भगवती आदी समकालीन अर्थतज्ज्ञांनी सेन यांच्या या विधानाचा जाहीर प्रतिवाद करून त्यातील फोलपणा नुकताच उघड केला. स्वातंत्र्यपूर्व काळात गोपाळराव आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यात सामाजिक सुधारणा आधी की राजकीय स्वातंत्र्य यांत जाहीर वाद होत. अर्थात सेन हे काही आगरकर नव्हेत आणि भगवती हेही टिळक नाहीत. परंतु या वादातून त्याही वेळी फार काही हाती लागले नाही आणि आताही त्याचे काही फलित असेल असे सांगता येणार नाही. तरीही सेन यांच्या विधानाची दखल घ्यायला हवी याचे कारण त्यामागील सुप्त राजकारण. सेन यांच्या विधानात तथ्य आहे असे मान्य केले तरी मनमोहन सिंग यांच्या धोरणलकव्याचे समर्थन करणार कसे? सिंग यांच्या धोरणांमुळे आर्थिक विकास न होता अन्य आघाडय़ांवर भरभराट झाली असती तरी सेन यांचे म्हणणे विश्वासार्ह वाटले असते. परंतु आर्थिक विकासही नाही आणि सामाजिक प्रगतीदेखील नाही अशीच अवस्था असेल तर केवळ आर्थिक प्रगती का होईना पण ती देणारा नरेंद्र मोदी हा जनतेस अधिक विश्वासार्ह नेता वाटत असेल तर त्यात चूक काय? खेरीज, सिंग सरकारच्या कारभारामुळे प्रगतीस मोठय़ा प्रमाणावर खीळ बसली आहे हे काँग्रेसजनांनाही नाकारता येणार नाही. मग ते दूरसंचार क्षेत्र असो वा कोळसा खाणी. सगळय़ा आघाडय़ांवर विकासाच्या नावाने एक मृतवत शांतता आहे आणि त्यास या सरकारचे धोरणशून्य कामकाज जबाबदार आहे. परंतु अमर्त्य सेन यांनी याबाबत कधी टीकेचा आसूड पंतप्रधान सिंग वा संबंधितांवर ओढल्याचे स्मरत नाही. आताही ज्या अन्न सुरक्षा योजनेमुळे सेन यांना सिंग सरकारचे कौतुक करावे असे वाटते त्या योजनेबाबत हे सरकार गंभीर असते तर ती योजना कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आणण्याचे निवडणुकीय चातुर्य काँग्रेसने दाखवले नसते. त्याही आधी आपल्या पहिल्याच खेपेत अशी योजना आणून ती यशस्वी करून दाखवण्याची संधी सिंग यांना होती. परंतु त्यांनी तसे केले नाही कारण या योजनेत काँग्रेससहित सर्वच पक्षांचे फक्त राजकीय हितसंबंध आहेत. अन्न सुरक्षा योजना लागू झाली तर ती आम्ही आणली म्हणून श्रेय घ्यायचे आणि ती लागू न झाल्यास विरोधकांच्या माथी ते फोडायचे हादेखील राजकीय हिशेब त्यामागे आहे. त्यात सेन यांना दिसतो तसा समाजाचे भले करण्याचा वगैरे कोणताही विचार नाही. तसा तो असता तर विद्यमान स्वस्त धान्य दुकान योजनेत जे तब्बल ४० टक्के इतके धान्य गायब होते ते रोखण्याचा प्रयत्न सिंग यांनी केला असता. तशी इच्छादेखील त्यांनी कधी व्यक्त केली नाही. तेव्हा काँग्रेसच्या मनातही जे नाही ते त्या पक्षाच्या योजनेत शोधण्याची उठाठेव अमर्त्य सेन यांनी करायची काहीच गरज नाही. लोकांस पाहय़ाचा आदर, तेथे याचा अनादर। लोक सर्वकाळ तत्पर, तेथे याची अनिच्छा.. असे खऱ्या नि:स्पृहाचे वर्णन समर्थ रामदासांनी केले आहे. तेव्हा सेन यांनी उभय बाजूंकडील न्यून मांडावे. केवळ एकाचेच, तेही सर्वाना ज्ञात असलेले दोषच ते दाखवत राहिले तर विद्वत्तेचा आव आणणाऱ्या अन्य सुमारांसारखेच अमर्त्य सेन हे मर्त्य वाटू लागतील.

सोमवार, २२ जुलै, २०१३

सांगलीला पूर येतो आणि ओरसतोही!

जयंतरावांनी दिले पराभवाने न खचता पुन्हा लढण्याचे संकेत सांगलीला पूर येतो आणि ओसरतोही. आमच्या बाजुने पुन्हा भविष्यात पूर येईल असे सांगत पराभवाने खचून न जाता राष्ट्रवादी सांगलीत पुन्हा लढाईला उतरेल असे संकेत ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिले. सांगलीत राष्ट्रवादीला 15 टक्के मते कमी पडतील असा अंदाज निवडणुकी पूर्वीच आला होता. त्यामुळे मी जास्त जोरात प्रचार केला. मात्र, आमचे महापौरच आमच्या बाजुने बोलण्यासाठी नसल्याने निवडणुकीपूर्वी वातावरण तयार करण्यात आम्हाला यश आले नाही, असेही ते म्हणाले. प्रतीक पाटील आणि काँग्रेसवर टीका जयंतरावांनी आपल्या मुलाखतीस केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्यासह काँग्रेसवर टीका केली. दहा वर्षे काँग्रेसकडे महापालिकेची सत्ता असताना त्यांनी विकासाचा विचारही केला नव्हता. म्हणून सांगलीकर जनतेने आम्हाला सत्ता दिली होती. आम्ही पाच वर्षात 604 कोटींची कामे मंजूर करून आणली आणि 303 कोटी रूपये खर्च केले. पण, त्याचा गवगवा करण्यास महापौर आमच्या बरोबर नव्हते, असे ते म्हणाले. प्रतीक पाटील लोकसभेला फार कमी मताधिक्क्याने विजयी झाले. त्यामुळे ते आमच्यावर चिडले आहेत. त्यांच्या विरोधात बंडखोरी करणारे अजितराव घोरपडे त्यावेळी काँग्रेसमध्येच होते. मी हातकणंगले, कोल्हापूरमध्ये गुंतलो होतो आणि आबांच्या मतदार संघात प्रतीक यांनाच मताधिक्य असतानाही ते विनाकारण राष्ट्रवादीच्या नावाने शेख मारत आहेत. प्रत्येकाच काम बोलत त्यांच्या कामावर जनतेन कमी अधिक विश्वास ठेवला, असा टोलाही जयंतरावांनी मारला. लोकसभा - पवारांचा निर्णय अंतिम येतय़ा लोकसभा निवडणुकीत उभे राहणार का? या प्रश्नावर लोकसभा अजून फार लांब आहे. याबाबतीत आताच औत्सुक्य दाखवण न दाखवण योग्य नाही. मात्र, शरद पवार जो निर्णय देतील तो मला मान्य असेल असे जयंतराव म्हणाले. आपल्या या मुलाखतीत महाआघाडीत केलेल्या विकास कामांचा त्यांनी पुनरूच्चार केला. आज जरी आम्ही आमची काम दाखवू शकतो नाही तरी 67 वरून 102 एमएलटी पाणी शहराला पुरवले, कनेक्शन दुप्पट केल, 900 कि.मी. पर्यंत पाईन लाईन बसवले, 120 कि.मी. नवी लाईनच काम सुरू आहे. दोन महिन्यात 78 आणि 38 एमएलटीचे दोन प्लँट सुरू होतील. अंडरग्राऊंड योजनेला 200 कोटी आले असून त्यानंतर डास मुक्ती होईल, 23 कोटींची रस्त्यांची कामे होतील, येत्या तीन वर्षात सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण, सांगली-पेठ मार्ग महामार्गाला जोडणे, अंडरग्राऊंड ड्रेनेज ही काम पूर्ण होतील. सिद्धेवाडी एमआयडडीसीचे सहा टप्पे पूर्ण झाले असून भूमी संपादन अंतिम टप्प्यात आहे. तिथे मोठे उद्योग येतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. - 15 टक्के मते घटण्याच्या अपेक्षेनेच जोरात प्रचार. - शहरात राष्ट्रवादी नव्हता, पराभवानंतरही सर्व वॉर्डात आमची ताकद वाढली आहे. - पक्षातील कोणीही माझा गेम केला नाही. - शहरात राष्ट्रवादीने पुन्हा पूर येईल. - काँग्रेसने विकासाचा विचारच न केल्याने आम्हाला सत्ता मिळाली होती. - महापौरच फुटल्याने आमच्या कामाचा प्रचार झाला नाही. - प्रतीक पाटील यांना फार कमी मताधिक्य असल्याने ते आमच्यावर चिडून.

रविवार, २१ जुलै, २०१३

मिरजेत बेंदरादिवशीच बैलाचा छळ

मिरवणुकीत मद्यधुंद शेतकऱयांचा प्रताप बैलांच्या पायात लावले फटाके नागरिकांची धावाधाव वर्षभर शेतात राबणाऱया बैलांना ज्या दिवशी विश्रांती द्यायची, त्या बेंदराच्या दिवशी शहरातील काही मद्यधुंद शेतकऱयांनी मिरवणुकीच्या नावाखाली बैलांच्या शेपटांना फटाके बांधून आणि त्यांना टोकदार वस्तूने टोचून अनन्वित छळ केला. रविवारी सायंकाळी शहरातील लक्ष्मी मार्केटच्या गजबजलेल्या परिसरात फटाक्यांच्या आवाजाने बैल उधळल्याने नागरिकांची धावाधाव झाली. या धावपळीत काही नागरिक रस्त्यावर पडून जखमीही झाले. नदीवेस भागातही असाच प्रकार रात्री उशीरापर्यंत सुरू होता. प्राणीमित्रांनी याबाबत पोलिसांत तक्रार करण्याचा पवित्रा घेतला आहे. रविवारी बेंदूर सण होता. वर्षभर शेतकऱयांसाठी राबणाऱया या मूक प्राण्याला एक दिवस विश्रांती द्यावी. या हेतूने हा सण शेतकरी बांधव साजरा करतात. या दिवशी बैलांना सजविण्यात येते. त्यांची पूजा करण्यात येते. या दिवशी त्यांच्याकडून कोणतेही काम करून न घेता त्यांना पूर्ण विश्रांती देण्यात येते. मात्र, बेंदराचा हे महत्त्व न समजलेल्या मिरजेतील काही मद्यधुंद शेतकऱयांनी रविवारी सायंकाळी बैल मिरवणुकीच्या नावाखाली बैलांचा अनन्वित छळ केला. रविवारी सायंकाळी शहरातील काही शेतकऱयांनी बैलजोडय़ांच्या मिरवणुका काढल्या होत्या. सवाद्य मिरवणुकीने सजविलेल्या बैलजोडय़ा शहरातील प्रमुख मार्गावरून नेण्यात आल्या. यापैकी काही शेतकऱयांनी मात्र बैलांच्या शेपटांना फटाके लावत त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. तर, त्यांना तीक्ष्ण आणि टोकदार वस्तुंनी टोचून बुजविण्याचा प्रयत्न केले. सुमारे तीन-चार तास हे प्रकार सुरू होते. यापैकी एक बैलजोडी लक्ष्मी मार्केट जवळ आली असता, फटाक्यांच्या आवाजने बुजून उधळली गेली. त्यामुळे गजबलेल्या या परिसरात एकच धावपळ उडाली. पावसाने चिखलमय झालेल्या या रस्त्यात काही नागरिक खाली पडले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या. नदीवेस भागात निघालेल्या मिरवणुकांतही वेगवेगळय़ा हत्त्यारांनी बैलांना बुजविण्याचे प्रकार घडले. या भागात रात्री उशीरापर्यंत या मिरवणुका सुरू होत्या. याबाबत प्राणीमित्र संघटनांनी शेतकऱयांना समजावण्याचे प्रयत्न केले. मात्र, मद्यधुंद अवस्थेत बेभान झालेल्या शेतकऱयांनी त्यांना जुमानले नाही. ज्या दिवशी बैलांना विश्रांती द्यायची त्याच दिवशी त्यांचा अनन्वित छळ केल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. बेंदरादिवशी झालेल्या या प्रकाराबाबत पोलिसात तक्रारी देण्याच्या हालचाली प्राणीमित्र संघटनांनी केल्या आहेत. पिपल्स फॉर ऍनिमल संघटनेचे अशोक लकडे यांनी याबाबत न्यायालयातही धाव घेणार असल्याचे सांगितले.