रविवार, २८ जुलै, २०१३

अलविदा पद्मिनी

मुंबई ही जशी चाकरमान्यांची, कॉर्पोरेटवाल्यांची, धनदांडग्यांची, डबेवाल्यांची तशीच ती टॅक्सीचालकांचीही.. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी टॅक्सीतून प्रवास केलेला असतो. कधी कामाच्या निमित्ताने तर कधी कुटुंबीयांना मुंबापुरीचे दर्शन घडवण्याच्या निमित्ताने. प्रत्येकाच्या मनात ही टॅक्सी घर करून असते. अशी ही टॅक्सी आता १ ऑगस्टपासून मुंबईच्या रस्त्यांना अलविदा करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून न कुरकुरता मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला आपलेसे करणाऱ्या या टॅक्सीला-पद्मिनीला अखेरचा सलाम..मुंबईतली.. नव्हे आशिया खंडातील सर्वात मोठय़ा झोपडपट्टीत, धारावीत राहणारा राजकरन यादव रोज सकाळी त्याची कालीपिली अर्थात टॅक्सी धारावीच्या गल्ल्यांमधून शिताफीने बाहेर काढत रस्त्यावर आणतो आणि सुरू होतो दिवसभराचा प्रवास.. उत्तर प्रदेशातल्या कुठल्याशा छोटय़ा गावातून आलेल्या राजकरनचं स्वप्न आहे श्रीमंत होऊन गावी जमीनजुमला घेण्याचं.. धारावीत खोली आणि स्वत:ची टॅक्सी एवढय़ा भांडवलावर आपले स्वप्न पूर्ण होणार नाही याची खात्रीच असते त्याला..श्रीमंत होण्याच्या नादात धारावीतील दोन झोपडपट्टीदादांच्या वादात तो भरडला जातो.. अखेरीस त्याची टॅक्सीही जाते आणि रोजगारही.. हे ढोबळ कथानक आहे धारावी या चित्रपटाचं.. १९९१ मध्ये झळकला होता हा चित्रपट.. बरोब्बर याच वर्षी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचं (लायसन्स-परमिट राज) जोखड झुगारून देत जगाला आपली बाजारपेठ खुली करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. तेव्हा या निर्णयावर खूप टीका झाली. परदेशी कंपन्यांपुढे देशांतर्गत बाजारपेठेचा टिकाव लागणार नाही वगरे आवया उठल्या होत्या त्या वेळी. मात्र, तरीही तत्कालीन सरकारने आपल्या निर्णयावर ठाम राहून खुल्या अर्थव्यवस्थेचं घोडं दामटलंच. त्याचे बरेवाईट (खरंतर बरेच) परिणाम आता २०-२२ वर्षांनी आपल्याला बघायला मिळताहेत.. अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांत हे बदलाचे वारे घुमू लागले होते. प्रस्थापितांना त्याची झळ पोहोचत होती.. त्यातलेच एक क्षेत्र म्हणजे वाहन निर्मिती क्षेत्र (ऑटो सेक्टर) प्रीमियर, अ‍ॅम्बॅसिडर, मारुती या गाडय़ांच्या चलतीच्या काळात आलेल्या खुल्या अर्थव्यवस्थेने या बाजारपेठेत तीव्र स्पर्धा निर्माण करत प्रस्थापितांना धक्का दिला. त्याचा पहिला बळी ठरला. प्रीमियर पद्मिनी.. १९६४ ते २००० या तब्बल साडेतीन दशकाच्या प्रवासात प्रीमियर कंपनीने भारतीयांवर अक्षरश: राज्य केले. वालचंद समूहातील प्रीमियर ऑटोमोबाइल्स लिमिटेड या विभागाचं अपत्य असलेल्या प्रीमियर पद्मिनीचं मूळचं लायसन्स मात्र इटलीचं. पद्मिनी म्हणजे कमळावर बसलेली लक्ष्मी.. ही लक्ष्मी आपल्या दारात असावी असं त्या काळच्या अनेकांचं स्वप्न असायचं. ताशी ११५ किमीचा वेग, प्रशस्त अंतर्गत व्यवस्था, चार गीअर्स अशा या सेडान प्रकारातील लक्ष्मीने मोठमोठे उद्योगपती, राजकारणी, अभिनेते, अभिनेत्री व तत्सम सेलिब्रिटींना भुरळ घातली. आपल्याकडे पद्मिनी असणं हा त्या वेळचा स्टेटस सिम्बॉल! मरीन ड्राइव्हवर (राणीचा हार) सुळकन वळणे घेत दिमाखात धावणारी पद्मिनी पाहणं हा त्या काळच्या मुंबईकरांचा खासा विरंगुळा. १९६० ते १९८० हा पद्मिनीचा सर्वोच्च लोकप्रियतेचा काळ. या काळातही तिला स्पर्धक नव्हती असे नाही. िहदुस्तान अ‍ॅम्बॅसिडर गाडीनं पद्मिनीपुढे भलंमोठ्ठं आव्हान उभं केलं होतं. मात्र, अ‍ॅम्बॅसिडरला सर्वसामान्यांची गाडी म्हणून मान्यता त्या वेळी तरी मिळाली नव्हती. ती कायमच राजभवन, मंत्रालयातील मंत्री-संत्री वगरे हाय प्रोफाइल लोकांच्या गराडय़ातच राहिली. आकर्षक दिसणं, चालवायला सोप्पी आणि कमी पेट्रोलमध्ये जास्त मायलेज या गुणवैशिष्टय़ांमुळे अ‍ॅम्बॅसिडरच्या आव्हानानं पद्मिनीच्या लोकप्रियतेत फारसा फरक पडला नाहीच. उलट उत्तरोत्तर तो वाढतच गेला. ८०च्या मध्यात तर प्रीमियर कंपनीने पद्मिनीचे एअर कंडिशन्ड मॉडेल उपलब्ध करून देत जनमानसावरील पकड आणखी घट्ट कशी होईल याची काळजी घेतली. शिवाय इंजिनात गुणात्मक फरक केल्यामुळे तिच्या वेगातही फरक पडला आणि ती आणखीनच आकर्षक झाली. त्यामुळे पद्मिनीची लोकप्रियता एवढी शिगेला पोहोचली की तिच्या बुकिंगसाठी कित्येक महिने वाट पाहावी लागायची. ८०च्या उत्तरार्धात मात्र पद्मिनीला तगडं आव्हान देणारा प्रतिस्पर्धी बाजारात उतरला. अधिक आधुनिक, स्वस्त आणि इंधनस्नेही असलेल्या मारुती सुझुकीने छोटय़ा कार्सच्या सेगमेंटमध्ये मारुती ८०० लाँच केली आणि अख्ख्या बाजारपेठेचा नूरच पालटून गेला. आकर्षक रंगात आणि ढंगात आलेल्या मारुतीने लोकांना वेड लावलं. मारुती रस्त्यांवर धावू लागताच पद्मिनीच्या लोकप्रियतेला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली. व्यावहारिक किंवा मग कॉर्पोरेटी भाषेत बोलायचं झाल्यास मारुतीने पद्मिनीचं मार्केट अक्षरश: खाऊन टाकलं. इतकं की पद्मिनीच्या खपात प्रचंड घसरण झाली. त्यात १९९१च्या खुल्या अर्थव्यवस्थेनं तीव्र स्पर्धा निर्माण केली ज्यात पद्मिनी टिकाव धरू शकली नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून १९९६ मध्ये पद्मिनीचं डीझेल व्हर्जनही बाजारात उतरवण्यात आलं. तिच्या इंजिनात बदल करून ती अधिकाधिक गतिमान करण्यात आली. मात्र, तरीही तिला काही उठाव मिळेनाच. अखेरीस २००० मध्ये पद्मिनीचे उत्पादनच बंद झालं. पद्मिनीचं उत्पादन बंद झालं तरी तिची ओळख खऱ्या अर्थाने टिकवली मुंबईने. टॅक्सीच्या रूपाने ती मुंबईकरांच्या कायमच स्मरणात राहिली. बॉलिवूड आणि टॅक्सी यांचे तर विशेष सख्य. अनेक चित्रपटांतून टॅक्सी आपल्याला दिसली. टॅक्सीचालकाच्या पुढय़ात तर एका बाजूला देवदेवतांचे फोटो तर दुसऱ्या बाजूला अमिताभ, आमिर, श्रीदेवी, कतरिना यांचे फोटो हमखास लागलेले दिसतात. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी टॅक्सीत बसून, गेला बाजार मंत्रालयापर्यंत प्रवास केलेलाच असतो. कालीपिली आणि पद्मिनी टॅक्सी हे समीकरणच होतं. पद्मिनीने आतापर्यंत अनेक मुंबईकरांना प्रवास घडवला आहे. शहरात सुमारे दहा हजार पद्मिनी टॅक्सी आहेत. १ ऑगस्टपासून त्या शहरातील रस्त्यांवरून नाहीशा होणार आहेत. मुंबईची आणखी एक ओळख काळाच्या पडद्यावरून नाहीशी होईल. कालीपिलीच्या जागा आता व्हॅन, मारुती वगरेसारख्या गाडय़ांनी घेतली असली तरी टॅक्सी म्हटले की डोळ्यासमोर प्रथम तरळतं ते प्रीमियर पद्मिनीचं रूपडं. ते काही कोणी हिरावून घेणार नाही, हे नक्की. पद्मिनीच्या बिदाईने अनेकांच्या पोटावर पाय येणार असला तरी नाइलाज आहे. १९९५च्या आधीच्या, २००० नंतरच्या वगरे अनेक झोपडय़ावजा छोटय़ा घरांमधील अनेक टॅक्सीचालकांचे रोजगाराचे साधनच हरपणार आहे. धारावी चित्रपटातील राजकरन यादवसारखे.. याच चित्रपटाच्या अखेरीस एक छानसं वाक्य आहे, 'समंदर में हरएक के नाम की लहर आती है.. सही वक्त पे जो पकड ले वो निकल गया..' राजकरन त्याची वाट पुन्हा शोधतो आणि मार्गाला लागतो. तसंच आताही टॅक्सीचालकांचे होईल. तेही त्यांचा मार्ग शोधतीलच. चालायचंच, कालाय तस्म नम:.. अलविदा पद्मिनी! यापुढे मुंबापुरीची ठळक वैशिष्टय़ं दर्शवणाऱ्या चित्र किंवा छायाचित्र प्रदर्शनांतच पद्मिनी दिसेल कदाचित.. टॅक्सीला ग्लॅमर मिळवून देणारे कलाकार देव आनंद, अमिताभ बच्चन, धर्मेद्र, शशी कपूर, ओम पुरी, नाना पाटेकर. टॅक्सीवरील चित्रपट १९५४ - टॅक्सी ड्रायव्हर १९५८ - टॅक्सी ५५५ १९७३ - टॅक्सी ड्रायव्हर १९८२ - खुद्दार २००६ - टॅक्सी नंबर ९२११

दम टाकला... लाभक्षेत्रातील उघडीपीमुळे विसर्ग कमी केला ,कृष्णा आणि वारणा आजपासून उतरणार ,कोयनेचा विसर्ग 46हजार तर वारणेचा चौदा हजार क्युसेक्स,सांगलीतील कर्नाळ रस्ता मात्र अजूनही बंद, बहे,ताकारी,भिलवडी येथे पातळी उतरली

कोयना, वारणा, कण्हेर, आणि धोम धरणांतून लाभक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने रविवारी पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला.त्यामुळे कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्यांना आलेला पूर आता उतरण्यास प्रारंभ झाला आहे. असून आयर्विनजवळ सोमवारी ती 35 फुटावर जाणार आणि त्यानंतर ही पाणीपातळी झपाटय़ाने उतरणार असल्याची शक्यता पाटबंधारे विभागातून देण्यात आली. पाऊस थांबल्यामुळे पुराची भीती ही संपली आहे. या पुरामुळे शहरातील कर्नाळ रस्ता अजूनही बंद आहे.सांगलीतील सूर्यवंशीनगर, इनामदार प्लॉट येथे पाणी आहे. कोयना धरणाचे दरवाजे बारा फुटानेच उचलले असून येथून विसर्ग कमी झाला आहे. ता46520 हजारवर करण्यात आला आहे. जिल्हय़ात बहे, ताकारी आणि भिलवडी येथे पाणीपातळी उतरली. वारणा धरणातूनही विसर्गही निम्म्याने कमी करण्यात आला आहे. तो 14 हजार 212 करण्यात आला आहे. आला. कण्हेर धरणातून केवळ 64 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर धोम धरणांतून फक्त 3444 क्यूसेसने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिह्यातही कमी अधीक प्रमाणात पाऊस सुरू होता. जिह्यातील कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यावर परिणाम करणाऱया कोयना, वारणा, धोम आणि कण्हेर या चारही धरणातील पाणीसाठा गेल्या 13 दिवसांपासून झपाटय़ाने वाढला होता पण या धरणांतून विसर्ग करण्यात आल्याने ही धरणे आता 90 टक्क्यावरून ती कमी होऊन 85 टक्केवर आली आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या धरण व्यवस्थापनाने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. 13 दिवसापासून कोयनेतून आणि नऊ दिवसापासून वारणेतून आणि आता सहा दिवसापासून कण्हेर धरणातून तर तीन दिवसांपासून धोम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कराड याठिकाणी आता पाणी तीन फूटाने उतरले आहे. सांगलीत कृष्णा नदीची पातळी सकाळपासून सायंकाळपर्यंत स्थिर होती सायंकाळी 37 फूटावरच होती. जिह्यात सातत्याने पावसाची रिपरिप पुर्णपणे थांबली आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत पावसाच्या पाण्याची होणारी वाढ ही थांबली आहे. रविवारी ती 35 फुटावर जाणार आहे. त्यामुळे शहरातील जामवाडी या भागातील पाणी ओसरणार आहे. शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट याठिकाणी पाणी शिरल्याने 45 कुंटुंबाचे स्थालंतर झाले आहे. या कुंटुंबाना महापालिकेच्या शाळा नंबर 25 व शाळा नंबर एक याठिकाणी ठेवण्यात आले आहे. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे वारणेला पूर आला आहे. भरतवाडी, कणेगाव याठिकाणचा संपर्क तुटला आहे. वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्याने विसर्ग निम्याने कमी केला आहे. तो आता 8 हजार विसर्ग सुरू ठेवण्यात आल्याने वारणेची पाणीपातळी झपाटय़ाने उतरणार आहे. शिराळा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क अजूनही तुटला आहे. शिराळा तालुक्याबरोबरच वारणा वाळवा तालुक्यातील नदीकाठच्या शेतीत पसरले आहे. हरिपूर येथे वारणा आणि कृष्णा नदीच्या संगमावर पाणीपातळी मात्र वाढली आहे आणि येथे वारणेच्या पाण्याच्या वेगामुळे कृष्णेचे पाणी थोपले जात असल्याने कृष्णेची आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी उतरण्यास अडचण येत आहे. कोयना धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी केला कोयना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने याठिकाणाहून विसर्गही कमी करण्यात आला आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे पण् तो फक्त 54 हजार इतकाच आता तोही विसर्ग रविवारी कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. या कोयना धरणांतील पाणीपातळी कमी झाल्याने ते पुर्णपणे थांबवण्यात येणार आहे. कृष्णा नदीतून आयर्विन पुलाजवळून सेकंदाला 88 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पण, तोच अंकली पुलाजवळ एक लाख 25 क्युसेसने सुरू झाला आहे. हरिपूर येथे वारणा आणि कृष्णा नदीचा संगम झाल्याने कृष्णेची पाणीपातळी एकदम दुप्पट होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून अंकलीजवळून सव्वा लाखाने विसर्ग होत आहे. कृष्णा आणि वारणेतील हे पाणी तातडीने पुढे सरकण्यासाठी अलमट्टी धरणांतून विसर्ग वाढविण्याचे आदेश देण्यात आल्या आहेत.आणि अलमट्टीमधून दोन लाख 54 हजारने विसर्ग शनिवारी सुरू ठेवला आहे. अलमट्टीमधून दोन लाख 54 हजार क्युसेस विसर्ग सुरू वारणा आणि कृष्णेतील पाणीपातळी स्थिर राहण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्गही त्या प्रमाणात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे याठिकाणाहून आता सेकंदाला दोन लाख 54 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणात पाणी दोन लाख 25 हजार क्युसेस येत आहे त्यामुळे अलमट्टी धरणांची उंची 517.60 इतकी स्थिर ठेवण्यात येत आहे. अलमट्टीमधून दुप्पट वेगाने पाणी सोडल्याने पाण्याची पातळी स्थिर रहात आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी कोयना येथे 53, महाबळेश्वर येथे 51, आणि नवजा येथे 40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात एकूण 86.71 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे हे धरण 82 टक्के भरले आहे. तर वारणा धरणात 29.26 इतका पाणीसाठा झाला आहे हे धरण 85 टक्के भरले आहे. धोम धरणात 10.77 टीएमसी आणि कण्हेर धरणात 8.42 इतका पाणीसाठा झाला आहे. कण्हेर धरणातून तीन हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या चारही धरणातील पाणीपातळी आता स्थिर झाली आहे. कृष्णा आणि वारणेचीही पाणीपातळी कमी होत आहे. बहे याठिकाणी कृष्णेची पाणीपातळी 12 फूट झाली होती ताकारी येथे 42 फूट 6 इंच झाली होती. भिलवडीत 41 फूट 6 इंच इतकी होती आयर्विन पुलाजवळ सकाळी ती 38 फूट सहा इंच होती ती सायंकाळी 38 फुट गेली. आणि अंकली येथे 43 फूटावर गेली आहे. जिह्यात इस्लामपूर येथे 5 मि.मी., पलूस येथे 2, तासगाव येथे 5, सांगली येथे 2, शिराळा येथे 11, मिरज येथे 00, विटा येथे 6, आटपाडी येथे 0, कवठेमहांकाळ येथे 2, जत येथे 6 आणि कडेगाव येथे 5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कृष्णेची पाणीपातळी बहे- 12 फूट, ताकारी - 42 फूट 8 इंच भिलवडी - 41 फूट सहा इंच आयर्विन - 38 फूट अंकली - 42 फूट 4 इंच

सांगली पूर दि. 28 जुलै 2013

शनिवार, २७ जुलै, २०१३

ऊसशेतीत एल.डी.पी.एस.सुधारित पद्धतीचा वापर

हरिपूर येथे शेतकऱयांचा प्रयोग पाच बाय चार लागण खर्च कमी, उत्पादनात वाढ शेकडो शेतकऱयांच्या भेटी @ सुनील पाटील / आष्टा ऊस हे बेट वर्गीय पिक आहे. ऊसाच्या एका बेटाला जेवढी जागा मिळेल तेवढे ऊसाचे उत्पादन वाढण्यास मदत होते. याचा विचार व अभ्यास करून हरीपूर येथील महावीर अनिल वर्धमाने या प्रगतीशील शेतकऱयाने लो डेन्सीटी प्लॅन्टेशन ऑफ शुगर केन या सुधारीत पद्धतीने ऊसाची लागण केली असून, या पद्धतीमुळे खर्च कमी झाला असून, एकरी शंभर टनापेक्षा अधिक उत्पादन मिळणार आहे. सध्या महाराष्ट्ता पारंपारिक पद्धतीचा ऊस शेतीसाठी वापर शेतकरी वर्ग करीत आहे. यामध्ये थोडयाफार प्रमाणात प्रयोग राबविणारे शेतकरी आहेत. मात्र ऊस लागणीवेळी पारंपारिक पद्धतीचा वापर केल्याने खर्चात वाढ होत आहे. उत्पादन थोडयाफार प्रमाणात वाढले तरी, खर्चामुळे व मजूरांच्या कमतरतेमुळे ऊस उत्पादक अडचणीत आला आहे. पारंपारिक ऊस शेतीमध्ये तीन फूटी सरीमध्ये ऊसाची लागण केली जाते. यासाठी लागणीवेळी एकरी बारा ते पंधरा हजार ऊसाच्या कांडया वापरल्या जातात. यासाठी चालू वर्षीच्या ऊस बीयाणांच्या दराप्रमाणे सात ते आठ हजार रूपये खर्च येतो. तसेच लागण कतरेवेळी एकरी तीन ते साडेतीन हजार रूपये शेतमजूरांना मजूरी दयावी लागते. एकरी ऊसलागणी पासून तोडणी पर्यंत सुमारे एक टन इतकी रासायनिक खते वापरली जातात. यासाठी सोळा ते वीस हजार रूपये इतका खर्च येतो. तसेच सरी लहान असल्याने तीन ते चार वेळा भांगलण करावी लागते. यासाठी आठ ते दहा हजार रूपये इतका खर्च अपेक्षित असतो. तर मशागतीसाठी सहा ते आठ हजार रूपये खर्च येतो. बियाणे, लागण, रासायनिक खते, मशागत, भांगलण, आदी खर्च मिळुन पारंपारिक ऊस पद्धतीत 45 हजार रूपये एकरी खर्च येतो. मात्र एकरी 50 ते 60 टन इतकेच उत्पादन मिळते. यासर्व बाबींचा विचार करून हरीपूर येथील महावीर वर्धमाने या शेतकऱयाने पावणे तीन एकरात लो डेन्सीटी प्लॅन्टेशन ऑफ शुगर केन या सुधारीत ऊसलागण पद्धतीचा वापर केला आहे. वर्धमाने यांना पोखर्णी येथील अशोका ऍग्री सोल्युशनचे तंत्रअधिकारी बीभिशन पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांनी पाच फूट इतक्या मोठया सऱया पाडल्या आहेत. सरीत प्रत्येकी चार फूटावर ऊसाचे रोप लावले आहे. लागणीसाठी त्यांनी नर्सरी चा वापर केला आहे. नर्सरीतील ऊस रोपांचा वापर केल्याने लागणीवेळी ऊसाची चांगली रोपे वर्धमाने यांना निवडता आली. तसेच नर्सरीच्या एक ते सव्वा महिन्याच्या काळात शेतात हिरवळीची खते घेवून त्यांनी पावणे तीन एकर क्षेत्र तण मुक्त केले. नैसर्गिक नियमांचा वापर करून सरी मोठी पाडल्याने तसेच ऊसाच्या दोन रोपांमध्ये अंतर जास्त ठेवल्याने ऊसाची दमदार वाढ झाली. ऊसाच्या एका बेटामध्ये अठरा ते वीस ऊसाची उगवन झाली आहे. गुंठयात 54 ऊसाची बेटे तयार झाली आहेत. ऊसाच्या एका बेटाचे वजन 45 ते 50 किलोच्या आसपास आरामात मिळत आहे. त्यामुळे एकरी 90 ते 100 टन ऊस उत्पादन निघण्यास कसलीच अडचण नाही. वर्धमाने यांच्या ऊस प्लॉट क्षेत्रास शेकडो प्रयोगशील व प्रगतीशील शेतकऱयांनी भेटी दिल्या आहेत. वर्धमाने यांनी या क्षेत्रातील दोन एकर इतक्या क्षेत्रातून नर्सरी पद्धतीने ऊस रोपे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ऊसाची जाडी व उंची चांगली असल्याने त्यांना दोन लाख ऊस रोपांची ऑर्डर मिळाली आहे. ऊस हे बेट वर्गीय पिक आहे. ऊस बेटासाठी वीस चौरस फूट इतकी जागा मिळणे आवश्यक असते. इतकी जागा मिळाली तर, ऊसाच्या उत्पादनात मोठया प्रमाणात वाढ मिळते. पारंपारिक पद्धतीत शेतकऱयांना याचा विसर पडला आहे. एल. डी. पी. एस. अर्थात लो डेन्सीटी प्लॅन्टेशन ऑफ शुगर केन या पद्धतीसाठी एकरी वर्धमाने यांना अवघा 34 हजार रूपये खर्च आला आहे. एक एकर लागणीसाठी त्यांनी 2200 कांडयाची नर्सरी वापरली आहे. यासाठी त्यांना 4 हजार रूपये खर्च आला आहे. ऊस लागणीसाठी रोपे असल्याने एकरी अवघा एक हजार रूपये इतका खर्च आला आहे. दोन सरीमधील अंतर जास्त असल्याने त्यांना भांगलणीसाटी पॉवर ट्लेरचा वापर करता आला आहे. त्यामुळे अवघ्या चार हजार इतका वर्षभराचा भांगलणीचा खर्च आला आहे. एकात्मिक सेंद्रीय रासायनिक खत पद्धतीचा त्यांनी वापर केला आहे. एकरी त्यांना अठरा ते एकोणीस हजार रूपये खतासाठी खर्च आला आहे. या सुधारीत पद्धतीमुळे वर्धमाने यांचा ऊस उत्पादन खर्च कमी झाला असून, उत्पादनात मोठया प्रमाणात वाढ मिळत आहे. वर्धमाने यांच्या या पद्धतीचा वापर महाराष्ट्तील ऊस उत्पादक शेतकऱयांनी करण्याची गरज आहे. ऊसाच्या दोन रोपांमधील अंतर जोपर्यंत वाढत नाही, तोपर्यंत ऊसाचे उत्पादन वाढणार नाही. असा वर्धमाने यांचा विश्वास आहे.

पूर ओसरू लागला

उघडिपीमुळे विसर्गात कपात कोयना, वारणा, कण्हेरमधून 65 हजार क्युसेस विसर्ग, अलमट्टीचा विसर्ग दोन लाख 54 हजार क्यूसेस ः कर्नाळ रस्ता अजून बंद कोयना, वारणा, कण्हेर आणि धोम धरणातून विसर्ग कमी केल्याने आणि पाऊस थांबल्याने कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्यांना आलेला पूर आता ओसरण्यास प्रारंभ झाला आहे. आयर्विन पुलाजवळ रविवारी पाणीपातळी 35 फुटावर जाईल आणि नंतर ती झपाटय़ाने उतरेल असा अंदाज आहे. पाऊस थांबल्यामुळे पुराची भीतीही संपली आहे. पुरामुळे शहरातील कर्नाळ रस्ता अजूनही बंद आहे. तर सूर्यवंशीनगर, इनामदार प्लॉट येथे पाणी आहे. कोयना धरणाचे दरवाजे 12 फुटानेच उचलले असून विसर्ग कमी झाला आहे. तो 54 हजारवर करण्यात आला आहे. जिह्यात बहे, ताकारी आणि भिलवडी येथे पाणी उतरले आहे. वारणा धरणातूनही विसर्गही निम्म्यावर आणला असून तो 16 हजार 191 क्युसेसवरून आठ हजारवर करण्यात आला. कण्हेर धरणातून दोन हजार 443 क्युसेस विसर्ग होत आहे. तर धोम धरणातून फक्त 300 क्युसेसने सुरू आहे. जिह्यात शनिवारी पाऊस थांबला आहे. पूर कमी करण्यासाठी अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. तेथून दोन लाख 54 हजार क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणेची पाणीपातळी मोठय़ा प्रमाणात कमी होत चालली आहे. जिह्यातील कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यावर परिणाम करणाऱया कोयना, वारणा, धोम आणि कण्हेर या चारही धरणातील पाणीसाठा गेल्या 13 दिवसापासून झपाटय़ाने वाढला होता. पण, या धरणातून विसर्ग करण्यात आल्याने ही धरणे आता 90 टक्क्यावरून ती कमी होऊन 85 वर आली आहेत. 13 दिवसापासून कोयना आणि नऊ दिवसापासून वारणा आणि आता सहा दिवसापासून कण्हेर धरणातून तर तीन दिवसापासून धोम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या चारही धरणातून मिळून एकूण 65 हजार क्यूसेस विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 90 हजारवरून तो इतका कमी केल्याने ही पाणीपातळी उतरत आहे. कराड येथे आता पातळी तीन फुटाने उतरली आहे. सांगलीत कृष्णेची पातळी सकाळपासून सायंकाळपर्यंत स्थिर होती. सकाळी 38 फूट असणारी पातळी सायंकाळी 38 फुटावरच होती. जिह्यात रिपरिप थांबली आहे. त्यामुळे शहरातील जामवाडी या भागातील पाणी ओसरणार आहे. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट याठिकाणी पाणी शिरल्याने 45 कुटुंबाचे स्थलांतर झाले आहे. या कुटुंबांना महापालिकेच्या शाळा नंबर 25 व शाळा नंबर एक येथे ठेवण्यात आले आहे. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे वारणेला पूर आला आहे. भरतवाडी- कणेगावचा संपर्क तुटला आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्याने विसर्ग निम्म्यावर आणल्याने वारणेची पातळी झपाटय़ाने उतरणार आहे. शिराळा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क अजूनही तुटला आहे. शिराळा तालुक्याबरोबरच वाळवा तालुक्यातील वारणा नदीकाठच्या शेतीत पाणी पसरले आहे. हरिपूर येथे वारणा आणि कृष्णा नदीच्या संगमावर पाणीपातळी मात्र वाढली आहे. कोयना धरणातून विसर्ग कमी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग फक्त 54 हजार इतकाच होत आहे. रविवारी विसर्ग कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. या कोयना धरणांतील पाणीपातळी कमी झाल्याने तो थांबवण्यात येणार आहे. कृष्णा नदीतून आयर्विन पुलाजवळून सेकंदाला 88 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर अंकली पुलाजवळ एक लाख 25 हजार क्युसेसने सुरू आहे. अलमट्टी ः दोन लाख 54 हजारने विसर्ग वारणा आणि कृष्णेतील पाणीपातळी स्थिर राहण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्गही त्या प्रमाणात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तेथून आता सेकंदाला दोन लाख 54 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणात पाणी दोन लाख 25 हजार क्युसेसने येत आहे त्यामुळे अलमट्टी धरणांची उंची 517.60 वर स्थिर ठेवण्यात येत आहे. अलमट्टीमधून दुप्पट वेगाने पाणी सोडल्याने पाण्याची पातळी स्थिर राहत आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी कोयना येथे 53, महाबळेश्वर 51 आणि नवजा येथे 40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात एकूण 86.71 टीएमसी पाणीसाठा असून धरण 82 टक्के भरले आहे. वारणा धरणात 29.26 टीएमसी पाणीसाठा झाला आहे धरण 85 टक्के भरले आहे. धोम धरणात 10.77 आणि कण्हेर धरणात 8.42 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कण्हेर धरणातून तीन हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या चारही धरणातील पाणीपातळी आता स्थिर झाली आहे. कृष्णा आणि वारणेचीही पाणीपातळी कमी होत आहे. बहे याठिकाणी कृष्णेची पाणीपातळी 12 फूट झाली होती ताकारी येथे 42 फूट 6 इंच झाली होती. भिलवडीत 41 फूट 6 इंच होती आयर्विन पुलाजवळ सकाळी ती 38 फूट सहा इंच होती ती सायंकाळी 38 फूटच राहिली आहे. अंकली येथे पातळी 43 फुटावर गेली आहे. जिह्यात शनिवारी इस्लामपूर येथे पाच मि.मी., पलूस दोन, तासगाव येथे पाच, सांगली दोन, शिराळा 11, मिरज येथे 0, विटा येथे सहा, आटपाडी येथे 0, कवठेमहांकाळ येथे दोन, जत येथे सहा आणि कडेगाव येथे पाच मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कृष्णेची पाणीपातळी बहे- 12 फूट, ताकारी - 42 फूट आठ इंच भिलवडी - 41 फूट सहा इंच आयर्विन - 38 फूट अंकली - 42 फूट चार इंच

पेट्रोलच्या उभ्या टँकरला बसची धडक ः दोघे जागीच ठार

कासेगाव जवळील दुर्घटना ः 22 प्रवाशी जखमीः शनिवारी पहाटे काळाचा घाला ः टँकर सुस्थितीत राहिल्याने मोठा अनर्थ टळला पुणे-बेंगलोर द्रुतगती मार्गावर कासेगाव जवळील येवलेवाडी फाटयावर उभ्या पेट्रोलच्या टँकरला पाठीमागून सांगली एस. टी. आगाराच्या निमआराम बसने जोराची धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात दोन प्रवाशी जागीच ठार झाले. तर 22 प्रवाशी जखमी झाले. शनिवारी पहाटे पावणेचार वाजता प्रवाशी साखर झोपेत असतानाच काळाने घाला घातला. टँकर पेट्रोलने भरलेला होता. धडक होवूनही टँकर पलटी न होता, जागीच राहिल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातादरम्यान एस. टी. बसचा टपासह वाहक बाजूने चक्काचूर झाला आहे. विजय श्रीरंग खराडे (24, रा. रामनगर आष्टा) व सुधीर सिद्राम गुरव (25, रा. वासुद अकोला, सांगोला) अशी ठार झालेल्या प्रवाशांची नांवे आहेत. तर श्रीकांत गजानन गुरव (तासगाव), अभिजीत रमेश कुलकर्णी, प्रवित्रा प्रदिप चौगुले, जय प्रदिप चौगुले, शालन धनपाल चौगुले, प्रमोद रामचंद्र वसगडेकर (सर्व रा. पुणे), अजय श्रीरंग खराडे (आष्टा) पोपट हंबीरराव पाटील (करंजवडे), अजित गणपत खांबे (बुधगाव) रणजीत मधुकर खोत (रा. शिरोळ ता. हाकणंगले) अशी जखमीचे नावे आहेत. टँकर क्रमांक के. ए. 28 बी. 4159 हा कराडहून कोल्हापूरकडे पेट्रोल भरून चालला होता. दरम्यान येवलेवाडी फाटयाजवळ आल्यानंतर टँकरचे चाक पंक्चर झाले. त्यामुळे महामार्गाच्या कडेला चाक बदलण्यासाठी टँकर उभा होता. सांगली आगाराची निमआराम बस क्रमांक एम. एच. 07 सी. 9574 ही पुण्याहून सांगलीकडे चालली होती. या बसवर सोमनाथ सदाशिव नवले (रा. आगळगाव) ते चालक होते. येवलेवाडी फाटयादरम्यान बस पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास आली. दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने टँकरला पाठीमागून जोराची धडक दिली. बसमध्ये 37 प्रवाशी होते. वाहक बाजूने मध्यापर्यत बसचा चक्काचूर झाला. तर बसमधील आसने विखुरली. यामध्ये खराडे व गुरव हे जागीच ठार झाले. पहाटेच्या साखर झोपेत ही दुर्घटना घडल्याने प्रवाशी घाबरून गेले. अपघातस्थळी आरडा-ओरडा व जखमींच्या व्हीवळण्याने परिसरातील लोक व कासेगाव पोलिस तात्काळ धावले. तातडीने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून काहींना कराड तर काहींना इस्लामपूर येथील राजारामबापू हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. 21 जखमीपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. शालन चौगुले, पोपट पाटील व प्रमोद वसगडेकर हे तिघेजण कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तर उर्वरित प्रवासी राजारामबापूमध्ये उपचार घेत आहेत. पंक्चर झालेले चाक बदलण्यासाठी थांबलेला टँकर पेट्रोलने भरलेला होता. बसची टँकरला जोराची धडक बसली. टँकरच्या पाठीमागील बाजूचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने पलटी व गळती न लागल्याने पुढील होणारा मोठा अनर्थ टळला. बस चालक नवले हे तीन वर्षापूर्वी बससेवेत रूजू झाले आहेत. दोन हजार तास सेवा बजावल्यानंतर चालकाला लांब पल्ल्याची डयुटी दिली जाते. त्याप्रमाणे नवले यांना नियमाप्रमाणेच डय़ुटी दिली होती, असे एस. महामंडळाच्या अधिकाऱयांनी सांगितले. झोपेमुळे नवले यांचा बसवरील ताबा सुटला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. अपघातानंतर विभागनियंत्रक राहुल तोरो, मॅकेनिकल विभाग प्रमुख कणेगावकर, विभागीय वाहतुक अधिकारी डी. बी. कदम, प्रादेशिक व्यवस्थापक आर. सी. पाटील, इस्लामपूर आगारप्रमुख डी. बी. मगदूम, स्थानक प्रमुख प्रदिप कांबळे यांनी तात्काळ भेट दिली. क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला घेऊन वाहतुक सुरळीत केली. एस.टी. व्यवस्थापनाने मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ पाच हजार रूपये व जखमींना जखमांच्या प्रमाणात आर्थिक मदत केली. या अपघाताची कासेगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अधिक तपास सपोनी बापूसाहेब शिंदे करीत आहेत.